नातेवाइकांच्या चौकशीने कोरोना रुग्णांचे होतेय खच्चीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:40 AM2021-04-24T04:40:14+5:302021-04-24T04:40:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कुटुंबात किंवा ओळखीच्यांमध्ये कोणी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर फोनद्वारे होणाऱ्या चौकशीचा रुग्णांसह कुटुंबीयांनाही त्रास होऊ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कुटुंबात किंवा ओळखीच्यांमध्ये कोणी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर फोनद्वारे होणाऱ्या चौकशीचा रुग्णांसह कुटुंबीयांनाही त्रास होऊ लागला आहे. समाज माध्यमांद्वारे येणारी आणि खातरजमा न केलेली माहिती रुग्णांना सांगून त्यांना अधिक गोंधळात टाकण्याचे काम अनाहूतपणे होत आहे. त्यामुळे कोणालाही संसर्ग झाल्याची माहिती मिळाल्यास थेट फोन करण्यापेक्षा मेसेजद्वारे त्यांना दिलासा देण्याचे काम नातेवाइकांनी करावे. अनेकदा चौकशीसाठी आलेले फोन कोरोना रुग्णांचे मानसिक खच्चीकरण करत असल्याचे पुढे येत आहे.
शतकातील सर्वात मोठा आजार म्हणून गणलेला कोरोनाने जवळपास प्रत्येक कुटुंबाला आपल्या मगरमिठीत घेतले आहे. कुटुंबातील एखादा सदस्य तरी पॉझिटिव्ह निघाल्याने आयसोलेशनसह सर्व बाबींना सामोरे जावं लागत आहे. जी कुटुंब छोट्याशा घरात राहतात त्यांच्या कुटुंबीयांना तर घर सोडून अन्यत्र राहण्याची वेळ येते. इतर आजारांमध्ये रुग्णाची सुश्रूषा करून त्याला दिलासा देण्याचा होणारा प्रयत्न या आजारात नसतो. त्यामुळे रुग्णाला एकाकी कोंडून घेऊन रहावे लागते. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर धक्क्यात असलेला रुग्ण तर या आजाराच्या आणि एकटेपणाच्या विचारानेच घाबरून जातात. आपल्या कुटुंबाची होणारी फरपट पाहून ते स्वत:ला दोष देत असतात. वर्षानुवर्षे कुटुंबासह राहण्याची सवय असलेल्यांना एकाकीपण खायला उठते. यातून होणारा कोंडमारा रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य बिघडवते. कोविड काळातील नकारात्मक विचार घालवून भविष्याची उमेद दाखवून रुग्णांना दिलासा देणं महत्त्वाचं आहे.
चौकट :
फोनला उत्तर देण्यातच जातोय वेळ
कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती नातेवाइकांना समजल्यानंतर काळजीस्तव फोन केले जातात. कसं झालं, कुठं झालं, कोणाकोणाला झालं यासह काळजी घेण्यापर्यंतच्या गप्पा नातेवाईक मारतात. घरात कोरोनाचा रुग्ण असल्याने कुटुंबाची मानसिकता आधीच कोसळलेली असती. त्यात नातेवाइकांचे भरमसाठ फोन आणि उपदेशांमुळे कुटुंबीय त्रस्त होतात. दिवसभर येणाऱ्या फोनला उत्तर देताना तेच तेच बोललं गेल्यानेही मनावरील दडपण वाढतं. एकीकडे रुग्णाचे मनोबल वाढवत असताना त्यांच्या कुटुंबीयांनाही सकारात्मक उर्जेची आवश्यकता असते, हेच अनेकांच्या लक्षात येत नाही.
कोट :
समाजमाध्यमातून दणादण आदळणारी कोरोनाची माहिती खरी का खोटी याची खात्री कोणीच केली नाही. पण स्वत:ला या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ही सर्व माहिती रुग्णाच्या मनात फेर धरतेय. या काळात ताण असला तरीही खूप दिवसात जे केलं नाही, किंवा करायचं राहून गेलं अस वाटतयं ते करण्यात मन गुंतवलं तर कोविड काळ सुसह्य ठरू शकतो.
- डॉ. राजश्री देशपांडे, मनोविकारतज्ज्ञ, सातारा
पॉईंटर
१. रुग्णांकडे फोन नकोच.
२. कुटुंबातील जबाबदार व्यक्तीने रुग्णाचे कॉल स्वीकारावेत.
३.निकटवर्तीयांचा ग्रुप करून त्याद्वारे आरोग्य माहिती द्यावी.
४.कोरोना किती भीतीदायक आहे, यापेक्षा तो बरा होऊ शकतो हे सांगा.
५. सरळठोक आलेल्या मेसेजचा भडिमार रुग्णांवर नको.
६. मानसिकरित्या खचलेल्या या रुग्णांना सकारात्मक विचार पोहोचवा.