रूग्णांचे नातेवाईकच ठरताहेत कोरोनाचे प्रमुख वाहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:42 AM2021-05-06T04:42:06+5:302021-05-06T04:42:06+5:30
सातारा : जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून कोरोना रुग्णांना घेऊन येणारे नातेवाईकच कोविडचे प्रमुख प्रचारक असल्याची धक्कादायक प्रचिती रुग्णालयाबाहेर येत आहे. ...
सातारा : जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून कोरोना रुग्णांना घेऊन येणारे नातेवाईकच कोविडचे प्रमुख प्रचारक असल्याची धक्कादायक प्रचिती रुग्णालयाबाहेर येत आहे. कोविड रुग्णालयात रुग्णांबरोबर येणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांचीही तपासणी करण्याची यंत्रणा उभी करणं गरजेचं होऊन बसलं आहे.
राज्यात सातारा जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या दिवसाला दोन हजारांवर पोहोचली आहे. ग्रामीण भागात आजार अंगावर काढणं, काही होत नाही म्हणून मेडिकलमधून औषधे आणि काढा घेण्याकडे कल दिसतो. परिणामी त्यांची प्रकृती खालावते आणि त्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर बेडची गरज भासले. ग्रामीण रुग्णालयांमध्ये या आधुनिक सोयी उपलब्ध होत नसल्याने या अत्यावस्थ रुग्णांना साताऱ्यात मोठ्या दवाखान्यांमध्ये आणले जाते.
कोविड रुग्णांना आधार देण्यासाठी त्यांच्यासोबत येणारे नातेवाईक त्यांची पाठ चोळत असतात, तर कोणी त्यांचा हात हातात घेऊन धीर देत असतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या बहुतांश रुग्णांची रुग्णालयात जायचं या विचारानेच घाबरगुंडी उडते. त्यामुळे त्यांना समजावून सांगणं, त्यांना जवळ घेणं असे आधार देण्याचे प्रकार नातेवाईक करतात. याच वेळी कोविडची लागण त्यांना होण्याची शक्यता वाढते. रूग्णालयाच्या आवारात रुग्णांना वेटिंगला ठेवल्यानंतर नातेवाईक या परिसरात फिरतात. कोणी पाणी प्यायला म्हणून तर कोणी काही खाण्याच्या निमित्ताने अन्य लोकांच्या जवळ जातात. यातून कोविडचा प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात नातेवाइकांची टेस्ट करणं क्रमप्राप्त बनलं आहे.
पॉईंटर
तोंडाला मास्कऐवजी स्कार्फ
बहुतांश कोरोनाबाधित विनामास्क
बाधितांना दिलासा देण्यासाठी नातेवाइकांचा स्पर्श
भावनिक ताण असल्याने मास्क आणि सॅनिटायझर वापराचं भानच नाही
चौकट :
सातारा जंबो कोविड सेंटरमध्ये रुग्णांची वेटिंग लिस्ट मोठी आहे. रोज दहाहून अधिक रुग्णांना सेंटरच्या बाहेरील बाजूस थांबावे लागते. ग्रामीण भागातील रुग्ण मिळेल त्या वाहनाने येतात. त्यामुळे ही वाहनेही कोविड कॅरिअर म्हणून विविध भागांत फिरतात. बाधिताला तिथे सोडल्यानंतर त्यांचे नातेवाईक सेंटरच्या परिसरातच घुटमळत असतात. अन्य नातेवाइकांशी बोलणं, त्यांचे फोन वापरणं, प्यायला तीच पाण्याची बाटली घेणं हे सर्वकाही खूपच ओघाने होत असल्याने हे सेंटरही कोविड प्रसाराचे प्रमुख कारण बनत असल्याचे पुढं येत आहे.
कोट :
ग्रामीण भागातून एका नातेवाइकाला घेऊन किमान तीन ते चारजण येतात. दुधाच्या किंवा अन्य उपलब्ध वाहनांतून बाधिताला रुग्णालयात पोहोचवले जाते. या प्रवासात कोणालाही सोशल डिस्टन्सिंगचे भान राहत नाही. त्यामुळे नातेवाइकांना बाधा होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. कोविड सेंटरच्या बाहेर नातेवाइकांची रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट करण्याची व्यवस्था यावर उपाय ठरू शकतो.
- असिफ खान, सातारा कोविड डिफेंडर ग्रुप