अपंग, निराधार योजनेच्या जाचक अटी शिथील करा
By admin | Published: February 15, 2015 08:50 PM2015-02-15T20:50:18+5:302015-02-15T23:42:40+5:30
तहसीलदारांना निवेदन : अपंग पुनर्वसन संस्थेची मागणी
'फलटण : निराधार व अपंग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी असलेल्या जाचक अटींमध्ये दुरुस्ती करून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठीची भटकंती थांबवावी, अशा विनंतीचे निवेदन फलटण तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने तहसीलदार विवेक जाधव यांना देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, अपंगांना संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, विधवा निराधार महिला आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करताना विविध कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या जाचक अटी व ती मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून होणारा विलंब यातून निराधार, अपंगांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. परिणामी योग्य लाभार्थीही या योजनांपासून दूर राहावे लागत आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून कागदपत्रांची जुळवाजुळव आणि ते मिळविण्यासाठी शासनस्तरावर होत असलेली कुचंबणा दूर करून योग्य लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळेल, अशा पद्धतीने त्याची आखणी करावी तसेच जाचक अटी
शिथील कराव्यात आदी मागण्यांचे
निवेदन तहसीलदार विवेक
जाधव यांना देण्यात आले
आहे. (प्रतिनिधी)
उपाययोजनेची मागणी
शासकीय योजनांचा लाभ मिळविताना शासन यंत्रणा तळागाळातील अपंगांना मानवतेच्या दृष्टिकोनातून सहाय्य करीत असल्याने अन्य तालुक्यात लाभार्थींची संख्या मोठी आहे फलटण तालुक्यातही अशाच पद्धतीने सहकार्य करून लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ठोस उपाय योजना आखण्याची मागणी निवदेनात केली आहे.