सांगलीसाठी कोयनेतून पाणी मागणीत वाढ, विसर्ग वाढवला; धरणात किती पाणीसाठा शिल्लक..जाणून घ्या
By नितीन काळेल | Published: April 20, 2024 11:29 AM2024-04-20T11:29:49+5:302024-04-20T11:30:37+5:30
एक जूनपर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागणार
सातारा : सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी मागणी वाढल्यामुळे कोयना धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून विमोचक द्वारमधून आता १२०० क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सांगलीसाठी आता पायथा वीजगृह आणि विमोचक द्वार असा मिळून ३ हजार ३०० क्यूसेकने विसर्ग सुरू झाला आहे. तर धरणात सध्या ४३ टीएमसीच साठा शिल्लक आहे.
कोयना धरणाचीपाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. तसेच सिंचन आणि पिण्याच्या पाणी योजनांसाठीही धरणातून विसर्ग केला जातो. यामध्ये सांगली जिल्ह्यातील अधिक करुन सिंचन पाणी योजनांचा समावेश आहे. त्यातच गेल्यावर्षी सातारा जिल्ह्यात अपुरे पर्जन्यमान झाले होते. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे धरण भरले नव्हते. धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीपर्यंतच पोहोचलेला. त्यामुळे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाण्याची मागणी होत होती. मागणी आणि तरतुदीनुसार सांगलीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. मागील पाच महिन्यांपासून हे पाणी मागणीनुसार सोडले जात आहे.
सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी ९ वाजता धरणाच्या विमोचक द्वारमधील विसर्ग ९०० वरुन १२०० क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. तसेच धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू आहेत. त्यामधूनही २१०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे सध्या सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी ३ हजार ३०० क्यूसेक पाणी विसर्ग होत आहे. हे सर्व कोयना नदीतून पुढे जात आहे.
दरम्यान, कोयना धरणात शनिवारी सकाळच्या सुमारास ४२.९३ टीएमसी पाणीसाठा होता. अजुनही धरणात ४०.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एक जूनपर्यंत कोयनेतील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यानंतर नवीन तांत्रिक वर्ष सुरू होते. याचदरम्यान, कोयना धरण विभागातही पावसाला सुरूवात होते.