अपहरण, लूट प्रकरणातील संशयितांची रेखाचित्रे जारी
By admin | Published: June 22, 2015 10:21 PM2015-06-22T22:21:47+5:302015-06-22T22:21:47+5:30
पोलीस असल्याचे सांगून लुटले होते पावणेसहा लाख
सातारा : गोडोली येथून एकाचे अपहरण करून त्याला शिवीगाळ आणि मारहाण करून लूट केल्याप्रकरणी हव्या असणाऱ्या तीन संशयितांची रेखाचित्रे पोलिसांनी जारी केली आहेत. संशयितांनी पाच लाख ८९ हजारांचा ऐवज लांबविला होता.
याप्रकरणी अभिजित संभाजीराव घोरपडे (वय ३९, रा. सुंदरा गार्डन, विसावा नाका, सातारा) यांनी फिर्याद दाखल केली होती. दि. १३ रोजी चार अनोळखी इसमांनी आपण ‘क्राइम ब्रँच’चे पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून घोरपडे यांना दटावणी केली. ‘तुम्हाला चौकशीसाठी आॅफिसमध्ये बोलावले आहे,’ असे सांगून कारमध्ये बसविले. नंतर लिंब खिंड, रहिमतपूरमार्गे औंध (ता. खटाव) आदी ठिकाणी नेऊन त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. त्यांना हाताने तसेच कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण करून त्यांच्याजवळील रोकड, वस्तू संशयितांनी काढून घेतली. संशयितांनी घोरपडे यांची पाच लाखांची कारही (एमएच ११ बीएच ६९६२) जबरदस्तीने नेली. याखेरीज ३५ हजारांची सोन्याची साखळी, १७ हजारांचे साडेआठ ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट, १० हजारांची पाच ग्रॅमची अंगठी, पाच हजारांचा मोबाइल, रोख २८०० रुपये आणि बँकेचे क्रेडिट कार्डही संशयितांनी हिसकावले. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून संशयितांनी वीस हजारांची रोकड काढल्याचा किंवा तेवढ्या रकमेची खरेदी केल्याचा संशय आहे.
संशयितांपैकी दोघेजण एकमेकांना ‘अमोल’ आणि ‘अमर’ नावाने हाक मारत होते. त्यातील अमर याने गॉगल घातला होता, तर अमर कार चालवीत होता, असे पोलिसांना चौकशीदरम्यान आढळून आले आहे. संशयितांच्या वर्णनावरून शहर पोलिसांनी त्यातील तिघांची रेखाचित्रे तयार केली आहेत. (प्रतिनिधी)