समाजातील काही घटकांच्या त्यागामुळे दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:11+5:302021-06-28T04:26:11+5:30
वडूज: कोरोना संसर्गजन्य महामारीच्या काळात समाजातील काही घटकांनी मोठा त्याग करत समर्पित भावनेने काम केले. त्या लोकांच्या त्यागामुळेच ...
वडूज: कोरोना संसर्गजन्य महामारीच्या काळात समाजातील काही घटकांनी मोठा त्याग करत समर्पित भावनेने काम केले. त्या लोकांच्या त्यागामुळेच कोरोनाग्रस्त रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला,’ असे मत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
सातेवाडी (ता. खटाव) येथील हुतात्मा स्मृती होम आयसोलेशन कक्षाच्या कृतज्ञता गौरव समारंभात ते बोलत होते. या वेळी परीक्षाविधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, माजी सभापती संदीप मांडवे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. एन. एस. गोडसे, सहायक गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, डॉ. संतोष मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यात कोरोना रुग्णांपासून कुटुंबातले लोकही सुरक्षित अंतर ठेवून होते. अशा वेळी मानसिक दडपण व भीतीमुळेच अनेकांचे बळी गेले. अशा परिस्थितीत समाजातील काही पदाधिकारी, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन बाधित लोकांना चांगला दिलासा दिला.’
या वेळी दोन महिने संपूर्ण इमारत मोफत देणारे सातेवाडीचे माजी सरपंच हणमंतराव कोळेकर, मोफत अन्नदान करणाऱ्या माणदेशी फाउंडेशन, प्रमोद बुगड, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका तसेच संयोजन करणाऱ्या जनता गॅरेजच्या सर्व पदाधिकारी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी प्रा. एन. एस. गोडसे, महेश गुरव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी सभापती संदीप मांडवे यांनी स्वागत केले. धनाजी गोडसे यांनी आभार मानले.