वाहतूक ‘सिग्नल’च्या भरवशावर; पोलिसांचा जोर फक्त ‘ई चलन’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 01:51 PM2021-11-29T13:51:29+5:302021-11-29T13:57:17+5:30

वाहतूक नियमन करण्याची जबाबदारी वाहतूक शाखेवर असते. पण सध्या वाहतूक ‘सिग्नल’च्या भरवशावर सुरू असून पोलीस कर्मचारी केवळ ‘ई चलन’ करून कारवाईचा आकडा वाढविण्यात व्यस्त असल्याचे दिसते.

Relying on traffic signals Police focus only on e challan | वाहतूक ‘सिग्नल’च्या भरवशावर; पोलिसांचा जोर फक्त ‘ई चलन’वर!

वाहतूक ‘सिग्नल’च्या भरवशावर; पोलिसांचा जोर फक्त ‘ई चलन’वर!

googlenewsNext

संजय पाटील

कऱ्हाड : कऱ्हाडच्या वाहतूक शाखेची अवस्था ‘नाव मोठं, लक्षण खोटं’ अशी झाली आहे. वाहतूक नियमन करण्याची जबाबदारी या शाखेवर असते; पण सध्या वाहतूक ‘सिग्नल’च्या भरवशावर सुरू असून पोलीस कर्मचारी केवळ ‘ई चलन’ करून कारवाईचा आकडा वाढविण्यात व्यस्त असल्याचे दिसते.

कऱ्हाडात आडोशाला उभे राहून वाहनांच्या नंबरप्लेटचे फोटो काढण्याचा वाहतूक पोलिसांचा एककलमी कार्यक्रम सध्या जोरात सुरू आहे. वाहतूक नियमन आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी असलेल्या या शाखेला सध्या मुख्य कामाचा विसर पडलाय. दिवसभर केवळ दंडात्मक कारवाईवर या शाखेचा जोर असून कर्मचारी वसुलीतच धन्यता मानत असल्याचे दिसते.

शहरात वाहतुकीचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. चौकाचौकाला वडापचा विळखा असून बेकायदेशीर वाहन थांब्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. सिग्नलला वडाप वाहनांनी घेरल्यामुळे सिग्नल परिसरच बेशिस्त असल्याची लाजीरवाणी परिस्थिती आहे. त्यातच नियमबाह्य पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. कोल्हापूर नाक्यापासून मुख्य बाजारपेठ मार्ग आणि शहरातील इतर अंतर्गत रस्त्यांवर कुठेही आणि कशीही वाहने उभी केलेली असतात. मात्र, हे पाहायला वाहतूक शाखेच्या कर्मचा-यांना वेळ नाही. ई-चलन करून दिवसभरातील कारवाईचा आकडा वाढविण्यात आणि वरिष्ठांकडून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यातच शाखेतील अधिकारी, कर्मचारी मग्न आहेत.

वाहतूक शाखेचा लेखाजोखा

१ : सहायक निरीक्षक

१ : पोलीस उपनिरीक्षक

३ : सहा. फौजदार

१२ : हवालदार

३७ : कर्मचारी

... येथे आहेत सिग्नल

 पोपटभाई पंप
भेदा हॉस्पिटल
कर्मवीर पुतळा चौक
विजय दिवस चौक
कॉटेज हॉस्पिटल
कृष्णा नाका चौक

... इकडे लक्ष द्या!

कोल्हापूर नाका : खासगी बसचे थैमान. उपमार्गाला वडापचा विळखा.

भेदा चौक : बेकायदेशीर थांब्यावर वडाप वाहनांची गर्दी.

दत्त चौक : रस्त्यावर झालेले अतिक्रमण. वाहतुकीला अडथळा.

मुख्य बाजारपेठ : बेशिस्त पार्किंग. अवजड वाहनांची रहदारी.

कर्मवीर चौक : वडापची मनमानी. वाहनांचे बेशिस्त पार्किंग.

विजय दिवस चौक : रस्त्यावर फळविक्रेते, हातगाडीवाल्यांचे बस्तान.

कृष्णा नाका : सिग्नलवरून होणारी प्रवाशांची वाहतूक.

‘सिग्नल’वरची शर्यत ?

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सध्या सहा ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे. आणखीही काही ठिकाणी ही यंत्रणा प्रस्तावित आहे. मात्र, सिग्नलच्या चौकात सध्या पोलीस थांबायलाच मागत नाहीत. वाहतूक केवळ सिग्नलच्या भरवशावर असून तेथे होणारी शर्यत रोखणार कोण, असा प्रश्न आहे. बहुतांश वाहनधारक सिग्नलचा नियम पाळतात. मात्र, काहीजण वाहने दामटत असल्यामुळे नियमभंग होण्याबरोबरच अपघाताचा धोकाही निर्माण होत आहे.

Web Title: Relying on traffic signals Police focus only on e challan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.