सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष, शिकार की मृत याबाबत साशंकता 

By दीपक शिंदे | Published: December 4, 2023 06:20 PM2023-12-04T18:20:11+5:302023-12-04T18:20:23+5:30

सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम भागामध्ये वन्यप्राण्यांच्या शिकारीचा गुंता अजूनही सुटायला तयार नाही. तृणभक्षी प्राण्यांच्या शिकारी सातत्याने होत ...

Remains of Sambar found in Sahyadri Tiger Reserve | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष, शिकार की मृत याबाबत साशंकता 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष, शिकार की मृत याबाबत साशंकता 

सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम भागामध्ये वन्यप्राण्यांच्या शिकारीचा गुंता अजूनही सुटायला तयार नाही. तृणभक्षी प्राण्यांच्या शिकारी सातत्याने होत आहेत. नुकतेच कारगाव येथे सांबराचे अवशेष आढळून आले आहेत. यावरून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना अभयारण्य परिसरात आजही राजरोसपणे शिकारी वन्यजीवांच्या हत्या करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोयना शिवसागराच्या पश्चिम भागातील निषिद्ध प्रवेश क्षेत्रात वन कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने शिकारी घुसखोरी करून वन्यजीवांची शिकार करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यातच सांबर या प्राण्याचा मृताचा सांगाडा, केस, पाय, बरगड्या हे अवशेष ताज्या अवस्थेत आढळल्यामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वन विभागाने शिकाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाईची पावले उचलावी, अशी स्थानिक जनतेतून मागणी होत आहे.

वन्यजीव संरक्षण व संवर्धन हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उद्दिष्ट असून ही या परिसरात अनेक वन्यजीवांच्या तस्करीसाठी हत्या होत असल्याने वन्यजीव संरक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सजगतेच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्मचारी दक्षतेचा पहारा देत असतील तर वन विभागाच्या हद्दीत शिकारी घुसतात कसे? वन्य प्राण्यांच्या हत्या करतात कसे? असे प्रश्न या परिसरातील स्थानिक जनतेमधून विचारण्यात येत आहे. वरिष्ठ विभागाने सांबर या वन्यप्राण्याची हत्या की मृत याचे प्रयोगशाळेतील नमुने तपासून याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पर्यावरणप्रेमींतून केली जात आहे.

तस्करीसाठी हत्या

सह्याद्रीत बिबट्या, खवलेमांजर, सांबर, रानडुक्कर आदी वन्यजीवांची तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात हत्या होत असल्याची माहिती आहे. मात्र, भीतीमुळे नाव न सांगण्याच्या अटीवर कोयना, कांदाटी खोरे परिसरातील काही लोक खासगीत चर्चा करतात.

कोट्यावधी रुपयांचा निधी

सह्याद्री व्याघ्र संवर्धनावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो. मात्र, वन्यजीवांचे संरक्षण होत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा जैवविविधतेने समृद्ध असा प्रकल्प असून वनखात्याच्या दुर्लक्षामुळे वन्यजीवांची हत्या, वाढती शिकार रोखण्यात अपयश येत आहे.

शिकार की मृत्यू याबाबत अद्याप आम्हाला काही कल्पना नाही. घटनास्थळी भेट देऊन संबंधित अवशेष ताब्यात घेऊन तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठवणार आहोत. - विजय बाठे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बामणोली

Web Title: Remains of Sambar found in Sahyadri Tiger Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.