कारखान्याच्या मैदानात विधानसभेचा ‘रिमेक’

By admin | Published: February 11, 2015 10:02 PM2015-02-11T22:02:51+5:302015-02-12T00:35:55+5:30

निवडणुकीचा बिगुल वाजला : बिनविरोधची हॅट्ट्रिक की दुरंगी-तिरंगी लढत ?

'Remake' of Legislative Assembly | कारखान्याच्या मैदानात विधानसभेचा ‘रिमेक’

कारखान्याच्या मैदानात विधानसभेचा ‘रिमेक’

Next

प्रमोद सुकरे - कऱ्हाड -यशवंतनगर, ता. कऱ्हाड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला आहे. बुधवार (दि. ११) पासूून अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. तर १७ मार्चला मतदान होणार आहे. मात्र, या निवडणुकीत गत दोन बिनविरोध निवडणुकींचा कित्ता गिरवून त्याची हॅट्ट्रिक साधली जाणार, की विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तिरंगी लढती होणार, याबाबत सध्या कार्यक्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर दिवंगत पी. डी. पाटील यांच्या पासून आमदार बाळासाहेब पाटील या कुटुंबाचीच सत्ता कायम राहिली आहे. कारखान्याच्या निवडणुका झाल्या खऱ्या; पण विरोधकांना कधीच त्यात यश मात्र आले नाही. यापूर्वीच्या गत दोन निवडणुका तर लागल्या; कधी अन् बिनविरोध झाल्या, कधी हे कोणाला कळालेही नाही. त्यात बाळासाहेबांच्या संयमी नेतृत्वाचे कसब लागले एवढे खरे!
कारखान्याच्या एकूण सभासदांची संख्या ३५ हजार ७८७ आहे. हे सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कऱ्हाड, तळबीड, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर व अन्य एका अशा सहा गटांतून १७ उमेदवार निवडले जाणार आहेत. तर दोन शेतकरी महिलांना संचालक होण्याची संधी मिळणार आहे.
याशिवाय अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती यामधून प्रत्येकी एक उमेदवार निवडला जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आपली फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने या चार दिवसांत बऱ्याच राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांनी ‘उत्तरे’तून विजयाची हॅट्ट्रिक मारत विरोधकांना चोख ‘उत्तर’ दिले. त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या बिनविरोध निवडणुकीची हॅट्ट्रिक बाळासाहेब मारतील का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागून आहेत. मात्र उत्तरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील कदम अन् स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे यांनी बाळासाहेबांच्या विरोधात तापवलेले रान अजून पूर्णपणे शांत झालेले दिसत नाही. त्यामुळे हे दोन्ही नेते कारखाना निवडणुकीत शांत बसतील, असे सध्या तरी वाटत नाही.
भविष्यातील राजकारणाचा वेध घेण्यासाठी विरोधी पॅनेल निवडणूक रिंगणात उतरले, तर सह्याद्रीच्या सभासद मतदाराला प्रदीर्घ कालावधीनंतर किंमत येणार हे खरे !

एकत्रित मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू
‘सह्याद्री’त सत्ताधारी गटाच्या विरोधात सक्षम दुसरे एकच पॅनेल उभे राहावे, यासाठी दक्षिणसह उत्तरेतील काही नेते छुपे प्रयत्न करीत आहेत. येत्या दोन दिवसांत यांची एकत्रित बैठक सातारा तालुक्यातील ‘एका गावात’ होणार असल्याची माहिती मिळत असून, त्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट व्हायला मदत होणार आहे. या बैठकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा वातावरण तापायला लागले आहे.


सह्याद्रीच्या कारभाराबाबत शेतकरी सभासदांच्यात असंतोष आहे. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीतही काही अंशी दिसून आले. होऊ घातलेल्या कारखाना निवडणुकीत काय निर्णय घ्यायचा, याबाबत येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी बोलून योग्य तो निर्णय लवकरच जाहीर करू.
- मनोज घोरपडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कऱ्हाड उत्तर

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या गलथान कारभाराबाबत वेळोवेळी आवाज उठवला आहे. गतवेळच्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी काही प्रश्न उपस्थित केले; मात्र त्याची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, त्यामुळे कारखाना निवडणुकीत सभासद शेतकऱ्यांचे पॅनेल रिंगणात उतरवणार आहे.
- धैर्यशील कदम,
कऱ्हाड उत्तर काँग्रेस

सह्याद्रीचा
रणसंग्राम

Web Title: 'Remake' of Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.