रेमडेसिविर हे अमृत नाही, विनाकारण आग्रह नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:39 AM2021-04-16T04:39:38+5:302021-04-16T04:39:38+5:30

सातारा : रेमडेसिविर इंजेक्शन म्हणजे अमृत नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांकडून या इंजेक्शनची वारंवार मागणी होत असल्याने त्याचा तुटवडा जाणवतो ...

Remedivir is not nectar, do not insist unnecessarily | रेमडेसिविर हे अमृत नाही, विनाकारण आग्रह नको

रेमडेसिविर हे अमृत नाही, विनाकारण आग्रह नको

Next

सातारा : रेमडेसिविर इंजेक्शन म्हणजे अमृत नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांकडून या इंजेक्शनची वारंवार मागणी होत असल्याने त्याचा तुटवडा जाणवतो आहे. ज्यांना खरोखर इंजेक्शनची गरज आहे, त्यांना ती इंजेक्शन मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे विनाकारण रेमडेसिविरची मागणी करू नये, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सातत्याने ज्या बातम्या कानावर येत आहेत, त्यातला एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा. त्याला तीन बाबी जबाबदार आहेत. त्यात पहिली बाब म्हणजे कोरोना रुग्णांची अचानक वाढलेली संख्या. दुसरी बाब म्हणजे रुग्ण संख्येच्या प्रमाणात तेवढे रेमडेसिविरचे उत्पादन नाही. अन् तिसरी फार महत्त्वाची बाब म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरिक्त वापर होत आहे.

शासनाने दिलेल्या सूचनेचा अभ्यास करून मगच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करावा. कोरोनाग्रस्त रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी झाली असेल आणि बाहेरून ऑक्सिजन देण्याची आवश्यकता भासत असेल आणि आजाराचा कालावधी हा १२ दिवसांच्या आत असेल तर आपल्या रुग्णाला रेमडेसिविरची आवश्यकता असते.

सतत तीन दिवस १०० च्यावर ताप आणि ऑक्सिजन लेवल ९२ च्या खाली असेल तर त्यावेळी रेमडेसिविरची आवश्यकता भासू शकते. बऱ्याचदा कॅन्सरच्या उपचारांमध्ये ती दिली जातात आणि न्यूमोनिया दिसत असेल तर अशा रुग्णाला त्याची आवश्यकता भासू शकते. सौम्य स्वरूपाचा आजार असेल तर रेमडेसिविरची आवश्यकता भासत नाही.

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्या रुग्णाला खरोखर रेमडेसिविरची आवश्यकता आहे का ? याची पडताळणी करावी. अनेकदा डॉक्टर सांगतात की, रुग्णाच्या नातेवाईकांकडूनच रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी केली जाते. त्यामुळे हे इंजेक्शन म्हणजे रुग्णाला वाचविण्याचे एकमेव साधन आहे असे समजून विनाकारण भ्रमात राहू नका. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करावेत. तसेच डॉक्टरांनी केलेल्या सूचनांनुसार नातेवाईकांनी रुग्णाला आवश्यक औषधे किंवा इंजेक्शन आणावीत, असे आवाहन देखील डॉ. कोल्हे यांनी केले आहे.

Web Title: Remedivir is not nectar, do not insist unnecessarily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.