मुख्याधिकारी हटाव... कऱ्हाडात ठराव!
By admin | Published: September 11, 2015 09:17 PM2015-09-11T21:17:19+5:302015-09-11T21:17:19+5:30
चौकशीची मागणी : गैरकारभाराचा ठेवला ठपका; पालिकेच्या विशेष सभेत एकमताने मंजुरी
कऱ्हाड : वेळेवर काम न करणे, खुलासा मागितल्यास तो नीट न देणे, बांधकाम परवाने दोन-तीन महिने न देणे, शहराच्या हिताला बाधा आणणे आदी आरोप ठेवत येथील पालिकेच्या विशेष सभेत मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्या बदलीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शुक्रवारी दुपारी १२ वाजता पालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्या गैरकारभाराबाबत विचारविनिमय करणे, हा एकच विषय होता. त्यावर सुमारे दीड तास घमासान होऊन हा मुख्याधिकाऱ्यांच्या गैरकारभाराच्या चौकशीचा व बदलीचा ठराव एकमुखाने करण्यात आला. नगराध्यक्षा अॅड. विद्या साळुंखे अध्यक्षस्थानी होत्या. नगरसेवक प्रमोद कदम यांनी या मूळच्या ठरावाचे वाचन केले. त्यात मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी गेल्या दोन वर्षांत पदाधिकारी व कर्मचारी यांच्याशी योग्य समन्वय न साधत एकतर्फी कारभार हाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहराचा विकास रखडला आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे शहराचा विकास होईल, असे वाटत नाही. मनमानी कारभार करणाऱ्या अशा अधिकाऱ्याची बदलीच करणे उचित होईल, असे मत मांडले. त्याला मोहसीन आंबेकरी यांनी अनुमोदन दिले, तर उपस्थित सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी त्याला एकमताने मुखसंमती दिली व ठराव मंजूर करण्यात आला.
त्यानंतर नगरसेवक अॅड. मानसिंगराव पाटील यांनी मुख्याधिकारी रोडे यांच्यावर थेट निशाणा साधला. ‘मुख्याधिकारी हा पालिकेचा आत्मा असतो; पण मीच सर्वज्ञ आहे, पालिकेतील लोकप्रतिनिधींना काही कळत नाही, अशा आविर्भावात त्यांनी गेली दोन वर्षे कारभार केला आहे. शहरातील रस्त्यांची झालेली चाळण हीच त्यांच्या कार्याची पोहोचपावती आहे. आम्ही केलेल्या ठरावाचा त्यांनी सन्मानाने स्वीकार करावा,’ असे त्यांनी सांगितले. लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील म्हणाले, ‘शंभर अपराध भरल्यानंतर लोकप्रतिनिधींनी सोडलेले हे सुदर्शनचक्र आहे. मुख्याधिकाऱ्यांची यातून सुटका नाही.’ केवळ मलकापूर नगरपंचायतीचे अतिक्रमण व पटेल यांच्या बांधकामाला परवानगी न देणे या दोन गोष्टींमुळे हा ठराव केलेला नसल्याचे सांगतानाच त्यांनी मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारींचा पाढाच वाचला. (प्रतिनिधी)
उपकारांची परतफेड नाही ना?
‘दोन वर्षांपूर्वी कोणाच्या तरी कृपेने तुम्ही कऱ्हाडचे मुख्याधिकारी झालात. त्या उपकारांची परतफेड आता बांधकाम परवाना न देऊन तुम्ही करत नाही ना,’ असा सवाल करतानाच ‘पटेल यांना बांधकाम परवाना न देण्यात तुमचा इंटरेस्ट काय आहे,’ असा चिमटा सुभाष पाटील यांनी प्रशांत रोडे यांना काढला.
मुख्याधिकारी शांतच
सकाळी साडेअकरा वाजता आयोजित केलेली विशेष सभा बारा वाजून पाच मिनिटांनी सुरू झाली. पण मुख्याधिकारी प्रशांत रोडे साडेअकरा वाजण्याअगोदरच सभागृहात हजर होते. त्यानंतर सुमारे दीड तास फक्त त्यांच्या विरोधातच सर्वांचे बोलणे सुरू होते. अनेकजण आक्रमक झाले होते; मात्र मुख्याधिकारी रोडे यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता दीड तास हे सर्व ऐकणेच पसंत केले.
मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. शासनाने घालून दिलेल्या चौकटीत राहूनच मी काम केले आहे. कोणाचीही अडवणूक केलेली नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याला त्रास दिलेला नाही. माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत; मात्र जर लोकप्रतिनिधींना माझे काम पसंतच नसेल, तर शासन देईल त्या ठिकाणी मी काम करण्यास तयार आहे.
- प्रशांत रोडे, मुख्याधिकारी,
कऱ्हाड नगरपरिषद