ऑफलाइनच्या सूचनेनुसार पालकांमधील संभ्रम दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:40 AM2021-02-24T04:40:58+5:302021-02-24T04:40:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता प्रशासनाने सुरक्षेबाबत आवाहन केले आहे. दहावी-बारावी परीक्षेबाबत बोर्डाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता प्रशासनाने सुरक्षेबाबत आवाहन केले आहे. दहावी-बारावी परीक्षेबाबत बोर्डाने ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकांमधील संभ्रम दूर झाला आहे. शाळा-महाविद्यालयांनीही कोरोनामुळे सुरक्षेबाबत दक्षता घेत सराव परीक्षांना प्रारंभ केला आहे.
दहावी व बारावीचे वर्ष महत्त्वपूर्ण आहे. शासनाच्या आदेशानुसार जूनपासून ऑनलाइन अध्यापन सुरू होते. मात्र नोव्हेंबरपासून ऑफलाइन अध्यापनास प्रारंभ झाला. बहुतांश अभ्यासक्रम आधीच पूर्ण झाला असल्याने शाळांनी अभ्यासक्रमाचा सराव सुरू केला होता. प्रत्यक्ष परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत पेपर लेखनाचा सराव घेण्यात येत आहे.
कोरोनामुळे संपूर्ण वर्ष भीतीमध्ये गेले. रुग्णवाढीनंतर परीक्षेबाबत धाकधूक निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्ष परीक्षा घेण्याचे जाहीर करून दिलासा दिला आहे.
- अजिता जाधव, पालक
ऑफलाइन परीक्षा होणार असल्या तरी कोरोनाचे सावट अद्याप आहे. त्यामुळे सुरक्षितता गरजेची आहे. परीक्षेबाबत बोर्डाने धोरण जाहीर करणे गरजेचे आहे.
- आसिफ शेख, पालक
बहुधा परीक्षेसाठी शहरात जावे लागते. मात्र कोरोना रुग्ण वाढत असल्याने याबाबत दक्षता म्हणून परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबत फेरविचार करण्यात यावा.
- सुनीता पालकर, पालक
कोरोना संकटात परीक्षा केंद्रापेक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात याव्यात. जेणेकरून परीक्षेसाठी दुसऱ्या गावात जाण्याची यातायात करावी लागणार नाही.
- सतीश कोल्हापुरे, पालक
परीक्षा केंद्रातील विद्यार्थी गर्दी विचारात घेता सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी परीक्षा केंद्रात वाढ करण्याची आवश्यकता आहे. याबाबत लवकर निर्णय घ्यावा.
- मृणालिनी जोशी, पालक
परीक्षा तोंडावर आहेत. नेमके रुग्णवाढीचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी नियोजन करीत असताना तळागाळातील विद्यार्थ्यांचा विचार व्हावा.
- शालिनी जगदाळे, पालक
दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या : ४४,०११
बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या : ३५,७०१