गळती काढा, नंतर पाणी कपातीचे बघा
By admin | Published: February 12, 2016 11:01 PM2016-02-12T23:01:06+5:302016-02-12T23:38:56+5:30
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सूचना : कास तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट
सातारा : ‘पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने कास धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून, नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. पाणी कपात अटळ असली तरीही पाणीपुरवठा विभागाने आधी शहरातील जलवाहिन्यांची गळती काढून पाणी बचत करावी,’ अशी सक्त सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाणीपुरवठा सभापतींसह विभागालाही केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने सर्वत्रच भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आता फेब्रुवारी महिना सुरू असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची पाणीपातळी खालावली आहे. साहजिकच सातारकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पावसासाठी अजून चार-पाच महिने अवधी असल्याने पाण्याचा वापर काटकसरीनेच करावा लागणार आहे. त्यासाठी सातारकर नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे.
दरम्यान, सातारा शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून हजारो-लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सातारा पालिकेने गळती काढण्याचे काम गांभीर्याने केल्यास वाया जाणाऱ्या पाण्याची बचत होणार आहे. पर्यायाने नागरिकांनाही जास्त दिवस पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने शहरातील जलवाहिन्यांना लागलेली गळती काढण्यासाठी प्राधान्य देऊन गळती कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.
किमान पावसाळा सुरू होईपर्यंत तरी, सातारकरांना पाणी उपलब्ध राहील. त्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आत्तापासूनच काळजी घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
प्राधिकरणाचे पालथ्या घड्यावर पाणी...
पालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिन्यांनाही मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे चित्र आहे. मात्र, प्राधिकरणाला सांगून काहीही उपयोग होणार नाही. त्यांचे काम म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी, असेच आहे. इतक्या वर्षात एकाही जलवाहिनीची गळती काढण्यात त्यांना यश आले नाही की, पाणीपुरवठा सुरळीत करता आला नाही. त्यामुळे आता सांगूनही त्यांच्याकडून काहीही होणार नाही. त्यांच्याकडून काहीही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. त्यामुळे प्राधिकरणाच्या जलवाहिन्यांची गळती काढण्याचेही काम पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेच करावे, अशी सूचनाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.