सातारा पालिका हद्दीतील धोकादायक होर्डिंग हटवा, मुख्याधिकाऱ्यांचा आदेश 

By सचिन काकडे | Published: May 20, 2024 07:07 PM2024-05-20T19:07:22+5:302024-05-20T19:07:40+5:30

घाटकोपर दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क, होर्डिंगधारकांनी मागितली मुदत

Remove the dangerous hoardings in the Satara municipality limits, the order of the chief executive | सातारा पालिका हद्दीतील धोकादायक होर्डिंग हटवा, मुख्याधिकाऱ्यांचा आदेश 

सातारा पालिका हद्दीतील धोकादायक होर्डिंग हटवा, मुख्याधिकाऱ्यांचा आदेश 

सातारा : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिका प्रशासन सतर्क झाले असून, शहरातील सर्व होर्डिंगधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवाय पालिकेच्या जागेत धोकादायक पद्धतीने उभी असलेली सर्व होर्डिंग तातडीने काढण्यात यावीत, असे आदेश प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिले आहेत.

मुंबईतील घाटकोपर येथे दि. १३ मेरोजी एका पेट्रोल पंपाजवळ महाकाय होर्डिंग कोसळून १६ जणांना आपला जीव गमवावा लागला तर ७५ हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर राज्यातील होर्डिंगचा प्रश्न सर्वाधिक चर्चेचा ठरला. सातारा पालिका प्रशासनानेदेखील घाटकोपर घटनेची गांभीर्याने दखल घेत शहरात ४१ होर्डिंग व्यावसायिकांना तातडीने नोटीस बजावून संंबंधित मिळकत व होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पालिकेकडे नोंद असलेल्या या ४१ व्यावसायिकांनी पालिकेच्या व खासगी जागेवर एकूण ३०० होर्डिंग उभारले आहेत. काही होर्डिंग आबालवृद्धांनी गजबजणाऱ्या उद्यानांजवळ लावण्यात आले असून, असे धोकादायक होर्डिंग तातडीने उतरविण्याचे आदेश मुख्याधिकारी बापट यांनी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला दिले आहे. राजवाडा परिसरात असलेल्या प्रतापसिंह उद्यानापासून होर्डिंग उतरविण्याची मोहीम सुरू करणार असल्याची माहिती अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख प्रशांत निकम यांनी दिली.

होर्डिंगधारकांनी मागितली मुदत

घाटकोपर दुर्घटनेनंतर पालिकेकडून तातडीने शहरातील होर्डिंगधारकांना नोटीस बजावण्यात आली. होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तीन दिवसांत पालिकेत सादर करण्याचे स्पष्ट आदेश त्यांना देण्यात आले. मात्र, हा कालावधी पुरेसा नसून पालिकेने स्ट्रक्चरल ऑडिटसाठी किमान सात दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी होर्डिंगधारकांनी पालिकेकडे केली आहे.

Web Title: Remove the dangerous hoardings in the Satara municipality limits, the order of the chief executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.