लोकवर्गणीतून साकारलेल्या भैरवनाथ सभामंडपाचा जीर्णोद्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:54 AM2021-01-02T04:54:42+5:302021-01-02T04:54:42+5:30
दहीवडी : पांढरवाडी (ता. माण) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या भव्य अशा सभामंडपाचा कार्यक्रम बुधवारी मोठ्या उत्साहात झाला. यावेळी ...
दहीवडी : पांढरवाडी (ता. माण) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या भव्य अशा सभामंडपाचा कार्यक्रम बुधवारी मोठ्या उत्साहात झाला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार, दि. ३० रोजीच्या रात्री मंदिरासमोर सभामंडपात ह.भ.प. भगवान महाराज कोकरे (चिपळूण) यांची कीर्तनसेवा झाली. सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत होमहवन, ११ ते १ वाजेपर्यंत सत्यनारायण महापूजा व नंतर दुपारपासून ते सायंकाळपर्यंत महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यानुसार सर्व भाविकांनी मनसोक्त भोजनाचा आस्वाद घेतला. रात्री ह. भ. प. सुभाष महाराज घाडगे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.
मागील दोन वर्षांपासून मंदिराच्या जीर्णोद्धाराला सुरुवात केली असता, लोकवर्गणीतून वारकरी संप्रदायाची कास धरणाऱ्या पांढरवाडी ग्रामस्थांनी पन्नास लाख रुपये खर्च करून सुंदर असे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर उभारले आहे. या नवीन मंदिरासह सभामंडपावर केलेल्या नयनरम्य रोषणाईने विशेष रंगत आली आहे. तसेच गावकऱ्यांमध्ये नवचैतन्य नांदू लागले आहे.