जागा सातारा पालिकेची अन् भाडे भलत्यालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:42 AM2021-05-20T04:42:54+5:302021-05-20T04:42:54+5:30
सातारा : सातारा पालिकेच्या जुना मोटार स्टँन्ड परिसरातील जागेवर रातोरात पत्र्याचे शेड बांधून परस्पर भाडे लाटण्याचा प्रकार समोर आला ...
सातारा : सातारा पालिकेच्या जुना मोटार स्टँन्ड परिसरातील जागेवर रातोरात पत्र्याचे शेड बांधून परस्पर भाडे लाटण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या निमित्ताने स्थावर जिंदगी विभाग करतो काय? याची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली असून, अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
सातारा पालिकेच्या स्थावर जिंदगी विभागाच्या रेकॉर्डवर २५३ जागा पालिकेच्या मालकीची असल्याची नोंद आहे; पण या जागांचा हिशेब, त्यांचा ताबा आणि त्याची देखभाल करणाऱ्या या विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
जुना मोटार स्टँन्ड परिसरात एका बंद पडलेल्या गिरणीशेजारी मोकळ्या जागेत दोन पत्र्याची शेड उभारण्यात आली आहेत. यातील एक शेड काही दिवसांपूर्वी नव्याने बांधण्यात आले आहे. काही सतर्क सातारकरांनी माहिती अधिकारात माहिती मिळविली, तेव्हा जागा पालिकेची असताना पालिकेला यातून साधी दमडीही मिळत नसल्याचे समोर आले. अतिक्रमण विभागाने पत्र्याची शेड तत्काळ पाडून टाकावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
हद्दवाढीमुळे शहर हद्दीतील मोकळ्या जागांचे मूल्य वाढले आहे. त्यामुळे पालिकेच्या जागांचे अद्ययावत रेकॉर्ड असणे गरजेचे आहे. मात्र राजकीय दबावातून होणारी अतिक्रमणे पालिकेसाठी नेहमीच अडचणीचा विषय ठरत आला आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी याप्रश्नी लक्ष घालून, मोकळ्या जागा ताब्यात घाव्यात व अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणीदेखील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.