पेरणीसाठी शेती औजारांच्या दुरूस्तीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:28 AM2021-06-01T04:28:48+5:302021-06-01T04:28:48+5:30
तळमावले : ‘मृगाची पेरणी, धनधान्य देई’ अशी म्हण आहे. दि. ११ जूनपासून मृग नक्षत्राचा प्रारंभ होत असून, खरीप हंगामाला ...
तळमावले : ‘मृगाची पेरणी, धनधान्य देई’ अशी म्हण आहे. दि. ११ जूनपासून मृग नक्षत्राचा प्रारंभ होत असून, खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने याच दिवसापासून सुरुवात होते. मान्सूनचे आगमन काही दिवसातच होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेती अवजारांची दुरुस्ती करण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
तळमावले विभागातील शिवारात सध्या पेरणीची लगबग सुरु झाली असल्याचे चित्र दिसत आहे. या विभागात अजूनही पारंपरिक शेती अवजारांच्या माध्यमातून शेती केली जाते. नांगर, कुळव, पाटे, चारफणी, सहाफणी आदी औजारांच्या माध्यमातून पेरणी केली जाते. एकदा पेरणी झाली की शेतकरी ही अवजारे व्यवस्थित सुरक्षित जागी ठेवतात. पुन्हा पुढच्या पेरणीलाच ही अवजारे बाहेर काढली जातात. वर्षभर एका ठिकाणी असल्यामुळे काही अवजारांची मोडतोड होते. सध्या त्या अवजारांची दुरुस्ती करण्याचे काम गतीने सुरू आहे. सुतारकाम करणाऱ्या कारागिरांकडून प्रामुख्याने ही अवजारे दुरुस्त केली जातात. त्या बदल्यात त्यांना धान्य अथवा पैसे दिले जातात.
काळगाव विभागामध्ये धूळवाफेवरील पेरणीला प्राधान्य दिले जाते. यामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग, मका आदी पिके घेतली जातात. सध्या या भागात पेरणीची धांदल सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण शिवार माणसांनी गजबजलेले दिसून येत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात वळिवाचा पाऊस म्हणावा तसा चांगला झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मे महिना संपत आला तरी तसा निवांतच होता. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे २ ते ३ दिवस या भागाला वारा आणि पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीला सुरुवात केली आहे.
- चौकट
उन्हाळी नांगरटीमुळे निघालेली मोठमोठी ढेकळं पावसाने विरघळून गेली आहेत. त्यामुळे सर्वजण शेतीच्या कामात गुंतले आहेत. बांधाची जुळवाजुळव करणे, शेतीतील सड, पालापाचोळा काढून रान स्वच्छ करणे, खत विस्कटणे आदी कामे महिला करत आहे. शेतकऱ्यांकडून शेतीची अवजारे दुरुस्त करुन घेण्याची धांदल सुरु आहे. नांगर, फाळ, इडी, कासरे, कुळव, पास, जानावळे, चारफणी, सहाफणी, त्याला लागणारे नळ, चाडे आदी साहित्याची जुळवाजुळव करण्यात शेतकरी गुंतले आहेत.
- कोट
मी मुंबईला खोका मार्केटमध्ये कामाला होतो. त्यावेळी पेरणीच्या वेळी गावी यायला लागायचे. अशावेळी शेतीची अवजारे नसली तर अडचण निर्माण व्हायची. यामुळे कारागिरांकडे जाऊन मी शेती अवजारे बनवायला आणि दुरुस्त करायला शिकलो आहे. शेतकऱ्यांची अडचण दूर होते, याचे मनाला समाधान वाटते.
- राजाराम डाकवे
शेतकरी व कारागिर
फोटो : ३१केआरडी०२
कॅप्शन : पेरणीच्या औजारांची दुरुस्ती करण्यात ग्रामीण भागातील शेतकरी व्यस्त असून, पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील राजाराम डाकवे हे शेतकऱ्यांच्या औजारांची दुरूस्ती करून देत आहेत. (छाया : पोपट माने)