ढासळलेल्या कठड्यांचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:15+5:302021-05-18T04:40:15+5:30
वाई : पाचगणी मुख्य रस्त्यावर पसरणी घाटात अपघातग्रस्त वाहनांच्या धडकेने संरक्षक कठड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ढासळलेले ...
वाई : पाचगणी मुख्य रस्त्यावर पसरणी घाटात अपघातग्रस्त वाहनांच्या धडकेने संरक्षक कठड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ढासळलेले कठडे अपघातास निमंत्रण देत होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी जीवघेणे अपघात झाले. त्याची दाखल बांधकाम विभागाने घेऊन पावसाळ्यापूर्वी घाटातील ढासळलेल्या कठड्यांचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पसरणी घाटात अनेक अपघात घडूनही बांधकाम विभागाची निधीअभावी पसरणी घाटातील दुरुस्तीची कामे करताना अडचणी येत होत्या.
पसरणी घाटात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसामुळे कठडे ढासळण्याचे प्रमाण जास्त होते. वाहन अपघातात वाहन दरीत कोसळून लाखो रुपयांच्या मालाचे व वाहनांचे नुकसान झाले आहे. कोसळणाऱ्या दरडी व ढासळलेल्या कठड्यासंदर्भात संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करून वाहनचालकांच्या व पर्यटकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबवावा, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. पावसाळ्यात तर ढासळणाऱ्या दरडी व दाटधुके, पावसाची रिपरिप यामुळे जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. मुळातच अरूंद घाट असल्याने पर्यटनाचा हंगाम चालू असल्यावर वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब होऊन बसली होती. बांधकाम विभागाने घाटातील संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचा विडाच उचलून २८ लाखांचा निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात करण्यात येत आहे. अनेक कठड्यांची कामे पूर्ण झालेली आहेत तसेच घाटातील रेशीम केंद्राजवळ धोकादायक वळण काढून लोकांच्या मागणीमुळे घाटाचे रूंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे पर्यटक, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोट..
शासनाने घाटदुरुस्तीच्या कामाला प्राधान्य देत ढासळलेल्या कठडे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. हे काम दर्जेदार चालू असून, पंधरा-वीस फूट उंचीचा पाया काढण्यात येत आहे. त्यामुळे वाहने खोल दरीत ढासळण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
-श्रीपाद जाधव,उपविभागीय बांधकाम अधिकारी
१७वाई
पसरणी घाटात पावसाळ्यापूर्वी घाटातील ढासळलेल्या कठड्यांचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.