रात्रीतच सुरू झाले पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीचे काम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:45 PM2019-12-19T18:45:36+5:302019-12-19T18:47:25+5:30
महामार्ग दुरवस्थेबाबत साताऱ्यात आॅक्टोबरमध्ये टोलविरोधी सातारा जनता नावाने सोशल मीडियावर सामान्यांची चळवळ सुरू झाली. समाजमाध्यमांद्वारे सुरू झालेली ही चळवळ पुढे व्यापक बनत गेली. जनसामान्यांचा रोष लक्षात घेत लोकप्रतिनिधींनीही यात सहभाग नोंदवला.
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाका बंद पाडून केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महामार्गा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर दिवसरात्र सुरू आहे. तिप्पट मनुष्यबळ लावून हे काम वेळेत पूर्ण करून देण्यासाठी रिलायन्स प्रयत्नशील आहे.
महामार्ग दुरवस्थेबाबत साताऱ्यात आॅक्टोबरमध्ये टोलविरोधी सातारा जनता नावाने सोशल मीडियावर सामान्यांची चळवळ सुरू झाली. समाजमाध्यमांद्वारे सुरू झालेली ही चळवळ पुढे व्यापक बनत गेली. जनसामान्यांचा रोष लक्षात घेत लोकप्रतिनिधींनीही यात सहभाग नोंदवला. प्रशासनाबरोबर बैठका घेऊन इशारा देऊनही महामार्गाची अवस्था सुधारली नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी आनेवाडी टोलनाक्यावर टोल वसुली बंद करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनही केले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
आक्रमक झालेले आंदोलक आणि प्रशासनाने सुनावलेल्या खडे बोलांमुळे महामार्गाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना रिलायन्सने ठेकेदारांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठेकेदारांनी मंगळवारी रात्रीपासूनच कामाला सुरुवात केली. चोवीस तास तीन शिफ्टमध्ये काम करून पहिल्या टप्प्यातील खड्डे मुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आंदोलकांना लेखी दिल्यानुसार हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांनी चक्क तिप्पट मनुष्यबळ लावले आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह हे काम निर्धारित वेळेत करण्याचा हिय्या केल्याचे दिसते.
प्रशासनाच्या बैठकीनंतर मिळाला कामाला वेग
महामार्गावरील दुरवस्थेच्या विरोधात बुधवारी आंदोलन करणार असल्याचे निवेदन सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर तातडीने मंगळवारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात जिल्हाधिकारी यांनी कणखर भूमिका घेतल्याने मंगळवारी रात्रीच रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम गुरुवार, दि. २० रोजी संध्याकाळी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले गेले आहे.