आंबेघरची पुनरावृत्ती साताऱ्याला सतावतेय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:32 AM2021-07-25T04:32:45+5:302021-07-25T04:32:45+5:30
सातारा : भूस्खलन होऊन माळीण झालं आता आंबेघर झालं, आता आणखीन भविष्यात काय वाढून ठेवलंय, याची चिंता तर आहेच. ...
सातारा : भूस्खलन होऊन माळीण झालं आता आंबेघर झालं, आता आणखीन भविष्यात काय वाढून ठेवलंय, याची चिंता तर आहेच. पण आंबेघरसारखी पुनरावृत्ती होणार तर नाही ना, या विचाराने अजिंक्यताराच्या पायथ्याला असलेल्या रहिवाशांना सतावलंय. जवळपास ३६३ घरे असलेल्या या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनात पावसाळा आला की अक्षरश: धस्स होतं. पण काळाची वाट पाहत दिवस पुढे ढकलण्याशिवाय या रहिवाशांच्या हातातही काहीच नाही.
भूस्खलनाच्या घटना गेल्या चार-पाच वर्षांपासून सगळीकडेच वाढलेल्या पाहायला मिळताहेत. शहरे दाटीवाटीने तुडुंब भरू लागलीत. फ्लॅट, जागेच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यात. त्यामुळे मिळेल त्याठिकाणी झाेपडी उभारून लोक वास्तव करू लागले आहेत. जिथं अडगळ आहे, डोंगर पायथा आहे, अशी जागा हेरून लोक रहिवास शोधू लागलेत. आताच नव्हे तर फार पूर्वीपासूनच साताऱ्यातील अजिंक्यताऱ्याच्या पायथ्यालाही अनेक कुटुंब स्थायिक झाली आहेत. या रहिवाशांच्या उशाला भला मोठा कड्या कपाऱ्यांचा अजिंक्यतारा आहे. घरातून बाहेर येऊन नुसत डोंगराकडे पाहिलं तरी काळीज चर्रर होऊन जातंय. इतक मन या रहिवाशांचं विचलित झालंय. त्याचे कारण म्हणजे पाटण तालुक्यातील आंबेघर आणि रायगडमधील तळीये याठिकाणी उद्भवलेली परिस्थिती या रहिवाशांच्या कान आणि डोळ्यांपर्यंत पोहाेचलीय. कोणी सकाळी-सकाळी घराच्या वर असलेल्या डोंगरावर जाऊन जमिनीला भेगा तर पडल्या नाहीत ना, याची खात्री करतंय तर कोणी मोठे दगड निसटण्याच्या मार्गावर तर नाहीत ना, याची चाचपणी करतंय. एकंदरीत सारेच जण हबकलेत. पण मनातील यातना सांगायच्या कोणाला, जर प्रशासनाला यातना सांगितल्या तर इथून कायमचा उठाव होईल, ही सगळ्यात मोठी त्यांना धास्ती. त्यामुळे काळाची वाट पाहात बसण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नसल्याचे काही रहिवाशांचे म्हणणे आहे. काही रहिवाशांची मालकी हक्काची जागा आहे. पण काहीजणांनी बेकायदा झोपड्याही इथे उभारल्यात. त्यामुळे अधिकृतपणे या रहिवाशांकडून प्रशासनाकडे कोणतीही मागणी केली जाणार नाही, हेच दिसते. पण काळ कधीही येऊन धडकेल, याची जाणीव मात्र या रहिवाशांना एखादी घटना घडल्यानंतर अधिक तीव्रतेने होतेय. आंबेघरच्या घटनेनंतर तर अधिक होऊ लागलीय. पावसाळ्याचे तीन महिने म्हणजे या रहिवाशांना एक वर्षासारखे वाटताहेत. जीव मुठीत घेऊन हे रहिवासी येणारा दिवस सुस्कारा सोडत पुढे ढकलताहेत. इतकी मनाची घालमेल या रहिवाशांची होतेय.
चाैकट : ही वेळ बोध घेण्याची...
अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला चारभिंतीपासून ते बोगद्यापर्यंत सरसकट वसाहती आहेत. डोंगराला अगदी खेटून अनेकांनी घरे बांधलीत. बोगदा परिसरात तर डोंगरावरच चक्क घरे बांधली गेली आहेत. अजूनपर्यंत तरी या रहिवाशांवर कसलीही आपत्ती ओढावलेली नाही. त्यामुळे ना जिल्हा प्रशासन आढावा घेतंय ना पालिका प्रशासन. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच मग एखाद्याला जबाबदार धरून घटनेची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न होतो. पण ज्यांचे नाहक जीव जातात त्यांचे काय, हा प्रश्न कायम राहतो. इतर जिल्ह्यांत सध्या घडलेल्या घटनांतून सातारा जिल्हा प्रशासनाने तरी बोध घायला हवा, इतकीच सातारकरांची अपेक्षा आहे.
फोटो : जावेद खान