साताऱ्यातील संग्रहालयात विसावले इतिहासाचे ‘साक्षीदार’!; दिल्लीवरून १२ किल्ल्यांची प्रतिकृती दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 01:00 PM2024-08-08T13:00:18+5:302024-08-08T13:01:42+5:30

सातारा : ‘युनोस्को’ला सादर करण्यात आलेल्या ऐतिहासिक बारा गड -किल्ल्यांच्या प्रतिकृती साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दाखल झाल्या आहेत. ...

Replicas of historical twelve forts submitted to UNESCO have been deposited in the Chhatrapati Shivaji Maharaj Museum in Satara | साताऱ्यातील संग्रहालयात विसावले इतिहासाचे ‘साक्षीदार’!; दिल्लीवरून १२ किल्ल्यांची प्रतिकृती दाखल

साताऱ्यातील संग्रहालयात विसावले इतिहासाचे ‘साक्षीदार’!; दिल्लीवरून १२ किल्ल्यांची प्रतिकृती दाखल

सातारा : ‘युनोस्को’ला सादर करण्यात आलेल्या ऐतिहासिक बारा गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दाखल झाल्या आहेत. या बारा किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील ११ तर तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे. संग्रहालयातील स्वतंत्र दालनात लवकरच या प्रतिकृती नागरिकांना पाहता येतील, अशी माहिती संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्राला समुद्र किनाऱ्यांपासून गड-किल्ल्यांपर्यंतचा भौगोलिक वारसा मिळाला आहे. या भौगोलिक वारशाने पर्यटनासाठी एक समृद्ध दालन खुले केले आहे. हे पर्यटन अधिक बहरावे, यासाठी राज्यातील काही शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा, याकरिता प्रयत्न सुरू होते. युनेस्कोचे ४६ वे अधिवेशन २१ ते ३१ जुलैदरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानात भरवले गेले. या प्रदर्शनासाठी अखिल महाराष्ट्र गीर्यारोहण महासंघाच्या १५ जणांच्या चमूने किल्ल्यांच्या प्रमाणित प्रतिकृती तयार करून त्या शासनाच्यावतीने युनेस्कोसमोर सादर केल्या.

यामध्ये किल्ले रायगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, खंडेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला अशा १२ किल्ल्यांच्या प्रतिकृतीचा समावेश होता. सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मॉडेल मेकर रमेश बलुरगी सांगली (हरिपूर) यांनी या सर्व किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली आहे. दिल्लीतील या प्रदर्शनानंतर या प्रतिकृतींचे संवर्धन करण्यासाठी शासनाने साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची निवड केली. मंगळवारी सकाळी दिल्लीवरून विशेष कंटेनरमधून या प्रतिकृती साताऱ्यात दाखल झाल्या. या प्रतिकृती सध्या बंदिस्त असून, लवकरच त्या पाहण्यासाठी खुल्या केल्या जाणार आहेत.

ड्रोनच्या मदतीने चित्रीकरण..

किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारताना प्रथमतः ड्रोनच्या मदतीने मूळ किल्ल्यांचे चित्रीकरण व मोजमाप करून या प्रतिकृतींचे प्रमाण आणि आकार ठरवण्यात आले. सात ते दहा फूट आकाराच्या या प्रतिकृती, सनबोर्ड, कागद, फेव्हिकॉल, पुट्टी, रंग आदींचा वापर करून प्लायवूडवर बसवण्यात आल्या आहेत. या प्रतिकृतीनंतर चाके लावलेल्या लोखंडी फ्रेमवरून त्या वाहून नेता येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

किल्ल्यांच्या या प्रतिकृतींसाठी संग्रहालयात स्वतंत्र दालन तयार केले जाणार आहे. शस्त्र प्रदर्शनाप्रमाणे या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतीदेखील नागरिकांना लवकरच पाहण्यासाठी खुल्या केल्या जातील. पुरातत्त्व विभागाकडून तसे प्रयत्न सुरू आहेत. - प्रवीण शिंदे, अभिरक्षक

Web Title: Replicas of historical twelve forts submitted to UNESCO have been deposited in the Chhatrapati Shivaji Maharaj Museum in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.