हिंगणी अन् बिदालमधील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:35 AM2021-01-22T04:35:51+5:302021-01-22T04:35:51+5:30
सातारा : माण तालुक्यातील हिंगणी, बिदालमधील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता शिरवळमधील मृत कावळ्यांचा अहवाल ...
सातारा : माण तालुक्यातील हिंगणी, बिदालमधील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता शिरवळमधील मृत कावळ्यांचा अहवाल बाकी आहे. तर गुरुवारी वाई तालुक्यातील ओझर्डेत मृत कावळा आढळला असून मरीआईचीवाडीत शास्त्रोक्त पध्दतीने मारण्यात आलेल्या कोंबड्यांच्या भरपाईपोटी संबंधितांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यात हणबरवाडी, खंडाळा तालुक्यातील मरीआईवाडी आणि माण तालुक्यामधील हिंगणी व बिदालमध्ये काही कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने या मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. दोन दिवसांपूर्वीच हणबरवाडी आणि मरीआईचीवाडीतील कोंबड्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार हणबरवाडीतील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर मरीआईचीवाडीतील पॉझिटिव्ह होता. त्यामुळे खबरदारी म्हणून मरीआईचीवाडीतील ४७९ कोंबड्यांना शास्त्रोक्त पध्दतीने मारुन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
गुरुवारी सकाळी माण तालुक्यातील दोन गावांमधील मृत कोंबड्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानुसार हिंगणी व बिदाल येथील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांतील भीतीही कमी होण्यास मदत झाली आहे. तर शिरवळमध्ये दोन कावळे मृत झाले होते. त्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल येणे बाकी आहे. त्याचबरोबर वाई तालुक्यातील ओझर्डे येथे एक मृत कावळा आढळला आहे. त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
कोट :
मरीआईचीवाडीमधील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पण, इतर तीन गावांतील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. माणमधील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये.
- डॉ. अंकुश परिहार, उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन विभाग
चौकट :
४७ हजार रुपये नुकसान भरपाई...
मरीआईचीवाडीतील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. त्यानंतर प्रशासनाने मृत कोंबड्यांचा भाग केंद्रबिंदू धरुन परिसरातील एक किलोमीटरमधील ४७९ कोंबड्या शास्त्रोक्त पध्दतीने मारुन टाकल्या. तसेच त्यांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आली. या कोंबड्यांच्या नुकसान भरपाईपोटी २२ लोकांना ४७ हजार ५०२ रुपये देण्यात येणार आहेत. संबंधितांच्या बँक खात्यावर शुक्रवारपर्यंत ही मदत जमा होईल, असे सांगण्यात आले.
.......................................................