३९ होर्डिंगचा अहवाल सादर; तर आठ जणांना हवी मुदत!

By सचिन काकडे | Published: May 28, 2024 09:27 PM2024-05-28T21:27:06+5:302024-05-28T21:27:32+5:30

सातारा पालिका : प्रशासन कारवाईवर ठाम

Report on 39 hoardings submitted; So eight people want a deadline! | ३९ होर्डिंगचा अहवाल सादर; तर आठ जणांना हवी मुदत!

३९ होर्डिंगचा अहवाल सादर; तर आठ जणांना हवी मुदत!

सातारा: सातारा पालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील पाच व्यावसायिकांनी ३९ होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल मंगळवारी पालिकेत सादर केला. तसेच आठ होर्डिंगधारकांनी अहवाल सादर करण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र, पालिकेने बजावलेल्या नोटिसीचा कालावधी संपुष्टात आल्याने प्रशासनाने मुदतवाढ देण्यास असमर्थता दर्शवली असून, होर्डिंग हटविण्याची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सातारा शहरातील ४१ व्यावसायिकांकडून पालिकेची मालकी असलेल्या व खासगी इमारतींवर एकूण ३०० होर्डिंग उभारण्यात आले आहेत. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने सर्व व्यावसायिकांना तातडीने नोटीस बजावून होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल, होर्डिंग उभारण्यासाठी दिलेले परवानगी पत्र, होर्डिंगची जमिनीपासूनची उंची, रुंदी याची माहिती, होर्डिंग उभारण्यात आलेल्या मिळकतीचा उतारा, करारनामा, मिळकत व जाहिरात कर भरल्याची पावती आदी दस्तऐवज तीन दिवसांत पालिकेत सादर करण्याचे आदेश दिले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देते आतापर्यंत केवळ पाच होर्डिंगधारकांनी ३९ होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल पालिकेत सादर केला. तर आठ जणांनी अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे. परंतु नोटिसीचा कालावधी समाप्त झाला असून, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीदेखील नादुरुस्त व कमकुवत होर्डिंग तत्काळ काढून टाकून अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने प्रशासन कारवाईवर ठाम आहे. सुरक्षेची सर्व साधने उपलब्ध होताच शहरातील अनधिकृत व धोकादायक होर्डिंग हटविले जातील, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांनी दिली

Web Title: Report on 39 hoardings submitted; So eight people want a deadline!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.