‘तारळी’बाबत अहवाल सादर करावा
By Admin | Published: February 1, 2015 09:03 PM2015-02-01T21:03:04+5:302015-02-02T00:07:45+5:30
विजय शिवतारे : प्रकल्पास भेट; शेतकऱ्यांनी दिले निवेदन
तारळे : ‘तारळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तसेच छोट्या उपसा जलसिंचन योजना राबविण्याबाबत पथदर्शी अहवाल सादर करावा,’ अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्या. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पाटण तालुक्यातील तारळी पाटबंधारे प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार शंभूराज देसाई, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, प्रांताधिकारी संजीव जाधव, कऱ्हाडचे प्रांताधिकारी किशोर पवार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, तहसीलदार रवींद्र सबनीस, कऱ्हाडचे तहसीलदार सुधाकर भोसले आदी उपस्थित होते.तारळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन यावेळी पालकमंत्र्यांना सादर केले. या निवेदनाबाबत चर्चा करून पालकमंत्री म्हणाले, ‘प्रत्यक्ष पाहणी करून लोकांशी संवाद साधल्यानंतर प्रश्न सुटतात. या भावनेने मी आज येथे आलो आहे. ऐतिहासिक, धोरणात्मक काम घडावे, असा माझा मनोदय आहे. त्या उद्देशानेच हा पाहणी दौरा आहे. पाचशे कोटींची योजना करण्यापेक्षा शंभर कोटींच्या पाच योजना करण्याबाबत आपला विचार आहे. छोट्याछोट्या उपसा जलसिंचन योजना करून त्याचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना करून देता येईल. त्या दृष्टीने माझे प्रयत्न असणार आहेत. छोटेछोटे पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी हयगय न करता पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत प्राधान्य द्या. काही बाबींमध्ये धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत. खऱ्या बाधित शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. पुनर्वसनाचे प्रश्न तसेच पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करावे, व याबाबतचा सखोल अहवाल मला सादर करावा. यातून निश्चितपणे मार्ग काढेन,’ असेही ते म्हणाले.
आमदार शंभूराज देसाई म्हणाले, ‘शेतकऱ्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री प्रत्यक्ष जाग्यावर आले आहेत. तारळी धरणाचे पाणी प्रथम पाटण तालुक्यात देण्याची मागणी सुरुवातीपासूनच मी करत आहे. एक्सप्रेस कॅनॉलने या धरणाचे पाणी माण, खटाव तसेच टेंभूलाही जाणार आहे. पालकमंत्री निश्चितपणे प्रश्न सोडवतील,’ असे अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी परिसरातील ग्रामस्थ, अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)