संशोधनातून अनेक माहिती उजेडात--महादेवाच्या डोंगररांगातही आढळल्या १४६४ वनस्पती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:54 PM2019-11-16T23:54:04+5:302019-11-16T23:55:18+5:30
निसर्गाकडून मिळालेले वरदान जपणे आपलेच काम आहे. विकास करण्यासाठी पर्यावरणाची हानी करणे हा पर्याय नाही. त्यामुळे स्थानिकांना पर्यावरणपूरक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. - प्रा. डॉ. सुहन मोहोळकर, वनस्पती अभ्यासक
जगदीश कोष्टी।
सातारा : पश्चिम घाटात जैवविवधता विपुल प्रमाणात आढळते, हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्याचप्रमाणे शंभू महादेवाच्या डोंगररांगांमध्ये आढळतात हे फारसे कोणाला माहीतच नाही. औंध येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुहन मोहोळकर यांनी नऊ वर्षे अभ्यास करून पीएचडी मिळवली. या यातील काही डोंगरांचा अभ्यास केला. त्यामुळे अनेक धक्कादायक माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर साधलेला संवाद...
- प्रश्न : याच विषयाची निवड का केली?
उत्तर : माधव गाडगीळ समितीच्या अहवालात पश्चिम घाट आणि शंभू महादेवाच्या डोंगररांगांचा हरित पट्ट्यात समावेश केला आहे. पण असंख्य वनस्पती अभ्यासकांनी महाबळेश्वर, कास, वासोटा, पाटण या पश्चिम घाटातील डोंगरांवर लक्ष केंद्रित केले आहे. शंभू महादेवाच्या डोंगररागांकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवल्याने हा विषय निवडला.
- प्रश्न : किती वनस्पतींचा अभ्यास केला?
उत्तर : महादेवाच्या डोंगररांगातील खंबाटकी, चंदनवंदन, हरहरेश्वर, सोळशी, चवणेश्वर, जरंडेश्वर, कल्याणगड, रामेश्वर, कार्तीक स्वामी, शामगाव, चौरंगीनाथ, सागरेश्वर, पाटेश्वर यांचा अभ्यास केला. या डोंगररांगांत १४६४ वनस्पती आढळून येतात. त्या १२० कुळातील असून, ११८ प्रकारच्या आहेत. त्यातील तेरा प्रकारच्या झाडांचा ‘रेन डाटा बुक’मध्ये समावेश झाला आहे.
- प्रश्न : वेगळेपण काय आढळले का?
उत्तर : ईरिनोकारपस, शेशाग्रिया, ट्रायलोबॅक्नी, ब्रेची स्टेलमा, ड्रीमिया कंजेस्टा, निलांबरी, फ्रेरिया, हिटेरोस्टेमा कंजेसटा, हिटेरोस्टेम उर्सिओ लॅटसी हे झुडूपवर्गीय वनस्पती आढळले. ते इतरत्र कोठे आढळत नाहीत. पश्चिम घाटात आढळणाऱ्यांपैकी सुमारे १९८ प्रकारच्या वनस्पतीही या डोंगररांगांमध्ये आढळत आहेत.
दुर्मीळ वनस्पती संपण्याच्या मार्गावर
विकासाच्या नावाखाली डोंगरावर पवनचक्क्या, सौरऊर्जा प्रकल्प उभारले जातात. महामार्गासाठी डोंगर पोखरले जातात. यामुळे दुर्मीळ वनस्पतींवर घाला येतो. पर्यटकांच्या गाड्यांसाठी मोठी जागा सोडली जाते. त्यामुळे वनस्पती वाढीला अडथळे येत आहेत. त्यामुळे शासनाने अशा डोंगररांगांमधील जैवविविधता जपण्यासाठी कसल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घ्यावी.
वनस्पतींना धोका
अनेकदा गुºहाखी, पर्यटकांकडून डोंगरांना वणवे लावले जातात. त्यामध्ये मौल्यवान औषधी वनस्पती, कंद वर्गीय ड्रिमिया कंटेस्ता ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तसेच माती धरून ठेवणारे गवतच जळत असल्याने धोका वाढला आहे.