पश्चिम घाटातील लाल खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन!, सातारकर संशोधकांना संधी
By प्रगती पाटील | Published: September 26, 2023 12:41 PM2023-09-26T12:41:12+5:302023-09-26T12:41:43+5:30
देशात पहिल्यांदाच पाच प्रजातींचा होणार प्रदीर्घ अभ्यास
प्रगती जाधव-पाटील
सातारा : आपल्या अस्तित्वासाठी जीवसृष्टीतील बहुतांश घटक स्थलांतर करतात. प्राणी आणि पक्ष्यांचे स्थलांतर सर्वश्रुत आहे. मात्र पश्चिम घाटासाठी प्रदेशनिष्ठ असलेल्या खेकड्यांच्या पाच प्रजातींचा प्रदीर्घ अभ्यास साताऱ्यातील संशोधक करणार आहेत. महादरे इकोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात ‘मेरी’ या संस्थेचे संशोधक हा अभ्यास करणार आहेत.
या संशोधनात खेकड्यांच्या पाच प्रजातींचा अभ्यास केला जाणार आहे. विशिष्ट हंगामात पठारावर येऊन, तर काही कालावधीनंतर पुन्हा सुप्त अवस्थेत जाणाऱ्या खेकड्यांविषयी हा अभ्यास केला जात आहे. भारतात गोड्या पाण्यातील खेकड्यांवर संशोधन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. घाटाच्या पठारांवरील खेकड्यांच्या वर्तनशास्त्र व स्थलांतराचा अभ्यास या प्रकल्पातून केला जाणार आहे. हा अभ्यास पूर्ण होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे.
संशोधनाबरोबरच स्थानिक लोकांची जनजागृतीही या प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. या संशोधनातून खेकड्यांची बरीच नावीन्यपूर्ण माहिती हाती लागणार असल्याचा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
या पाच प्रजातींवर होणार संशोधन
- बॅरीटेलपुसा कॅनीक्युलारीस,
- इंग्लेथेपुसा फ्राँटो,
- सह्याद्रीयाना अल्कोकी,
- बारुसा ग्रासीलिमा,
- घाटीयाना पुल्क्रा.
- आणखी एक आहे तिची अजून ओळख पटलेली नाही.
पहिल्यादांच होणार गोड्या पाण्यातील खेकड्यांवर अभ्यास
पश्चिम घाटातील पठारी प्रदेशात आढळणाऱ्या गोड्या पाण्यातील हंगामी खेकड्यांवर अभ्यास होणार आहे. हे खेकडे वर्षभराच्या कालावधीत जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत सक्रिय असतात. इतर वेळी हे सुप्त अवस्थेत असतात. सक्रिय अवस्थेत प्रजनन कालावधीनंतर शरीराची संपूर्ण वाढ करून घेण्याबरोबरच सुप्त अवस्थेतील कालावधीत अतिरिक्त चरबीचा संचयही हे करतात. यामुळे सात महिने काहीही न खाता ते जिवंत राहू शकतात.
पश्चिम घाट आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना हा भारतासाठी निसर्गाचा एक अनमोल ठेवा आहे. खेकड्यांसारख्या छोट्या आणि काहीशा दुर्लक्षित जीवांवरील संशोधनामुळे येथील अनोख्या जैवविविधतेवर अधिक अभ्यास होऊन त्याच्या जतनासाठीचे प्रयत्न करता येतील. - सुनील भोईटे, मुख्य संशोधक, महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी), सातारा