साताऱ्यात ४० पैकी २७ नगरसेवक पदे आरक्षित

By admin | Published: July 3, 2016 12:11 AM2016-07-03T00:11:17+5:302016-07-03T00:11:17+5:30

प्रभागांची मोडतोड : दुसरा पर्यायांचा शोध

Reserved 27 councilor posts in Satara | साताऱ्यात ४० पैकी २७ नगरसेवक पदे आरक्षित

साताऱ्यात ४० पैकी २७ नगरसेवक पदे आरक्षित

Next

सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठी नगरसेवक पदांची आरक्षण सोडत शनिवारी पार पडली. या सोडतीमध्ये ४० नगरसेवक पदांपैकी २७ नगरसेवक पदे आरक्षित झाली आहेत. २० महिलांना पालिकेत संधी मिळणार आहे. खुल्या प्रवर्गातून १३ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. दोन्ही आघाड्यांतील काही विद्यमान नगसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत.
येथील शाहू कला मंदिरात सकाळी उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पालिकेच्या नगरसेवकपदासाठी आरक्षण सोडत पार पडली. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लॉटरी पद्धतीने ही आरक्षणे काढण्यात आली. प्रभाग क्र. १, २, ३, ४ व ७ या प्रभागामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या जास्त असल्याने हे पाचही प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले. या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असणार आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झालेल्या प्रभागांपैकी ८, ११, १५, १८, १९, २० हे प्रभाग महिलांसाठी राखीव झाले तर ६, १३, १४, ९, १० या प्रभागांवर पुरुषांना संधी मिळणार आहे. या प्रभागांच्या माध्यमातून ११ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना पालिकेत संधी मिळणार आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील ११ महिलांना संधी मिळणार असून, प्रभाग ५ अ, १२ अ, १६ अ, १७ अ, २ ब, ६ ब, ७ ब, ९ ब, १० ब, १३ ब, १४ ब या ठिकाणी त्या प्रतिनिधीत्व करू शकतील. सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुषांना प्रभाग १ ब, ३ ब, ४ ब, ५ ब, ८ ब, ११ ब, १२ ब, १५ ब, १६ ब, १७ ब, १८ ब, १९ ब, २० ब या १३ जागांवर संधी मिळणार आहे.
सोडतीच्या कार्यक्रमाला विद्यमान नगरसेवकांसह इच्छुक मंडळींची मोठ्या संख्येने हजेरी होती. निवडणुकीसाठी प्रभागांची मोडतोड करण्यात आली आहे. या मोडतोडीत अनेकजण प्रभागापासून पराधिन झाले आहेत. या सोडतीने ‘कही खुशी... कही गम’ असे चित्र पाहायला मिळाले.
प्रभाग रचना झिगझॅग पद्धतीने केली गेली आहे. मागील निवडणुकीनुसार एका प्रभागात चार नगरसेवक कार्यरत होते; परंतु आता एका प्रभागात दोन नगरसेवक असणार आहेत. प्रभागांची संख्या वाढून १० च्या जागी आता २० प्रभाग असतील.
मागील पाच वर्षांत ज्या प्रभागांचे नेतृत्व केले, तो भाग दुसऱ्याच प्रभागाला जोडला गेला असल्याने विद्यमान नगरसेवकांना आगामी निवडणुकीला सामोरे जाताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ‘साविआ’च्या बहुतांश नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांची गोची झाल्याची शहरात चर्चा आहे. (प्रतिनिधी)

जाहीर झालेले आरक्षण असे
प्रभाग १ : अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग २ : अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ : अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग ४ : अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग : ५ : सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग ६ : इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ : अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ : इतर मागास महिला, सर्वसाधारण, प्रभाग ९ : इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग १० : इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग ११ : इतर मागास महिला, सर्वसाधारण, प्रभाग १२ : सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग १३ : इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग १४ : इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग १५ : इतर मागास महिला, सर्वसाधारण, प्रभाग १६ : सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग १७ : सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग १८ : इतर मागास महिला, सर्वसाधारण, प्रभाग १९ : इतर मागास महिला, सर्वसाधारण, प्रभाग २० : इतर मागास महिला, सर्वसाधारण

Web Title: Reserved 27 councilor posts in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.