राष्ट्रवादीमधील राजीनामा प्रकरण स्क्रिप्टेड, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची टिका
By दीपक देशमुख | Published: May 6, 2023 04:11 PM2023-05-06T16:11:13+5:302023-05-06T16:23:16+5:30
येणाऱ्या निवडणुकात भाजप ताकद दाखवेल
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस सध्या अंतर्गत कलहात गुंतलेली आहे. त्यामुळे राजीनामा देणे आणि मागे घेणे असे स्क्रीप्टेड नाटक करावे लागले आहे. कोणी राजीनामा देतंय, मग लाेक रडताहेत, समजूत घातली जातेय. मग राजीनामा मागे घेतला जातोय, हे सर्व पूर्वनियोजित वाटत असल्याचे लोक बोलू लागले आहेत, अशी टिका केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मिश्रा म्हणाले, सातारा जिल्ह्यात यापुर्वी राष्ट्रवादीची ताकद असेलही पण सध्या जिल्ह्यात प्रत्येक बूथवर भाजप पोहोचली आहे. येणाऱ्या निवडणुकात भाजप ताकद दाखवेल. सातारा जिल्हा व बारामतीच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर भाजप येईल, असा दावा मिश्रा यांनी यावेळी केला. जंतर मंतर येथे उपोषणाला बसलेल्या मल्ल फोगट भगिनी यांच्या उपोषणाबाबत मिश्रा म्हणाले, याबाबत न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. याचा तपास हाेवून योग्य ती कार्यवाही सुरू आहे.
महाराष्ट्रात भाजपाचा विश्वासघात करून महाविकास आघाडीचे सरकार आले. यामुळे महाराष्ट्र विकासात दहा वर्षे मागे गेला. त्यामुळ कर्नाटकची जनता भाजपाला साथ देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशातील अनेक छोटे-मोठ्या विरेाधी पक्षांनी एकत्र येवून मोदी हटाव हा एवढाच कार्यक्रम ठेवला आहे. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणताही ठोस अजेंडा नाही. अशा आघाड्यांचा काहीही फायदा नसतो, असेही मिश्रा म्हणाले.
यावेळी मिश्रा यांनी जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामसडक योजना, जलजिवन मिशन या योजनांचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. घरकुल योजना ९० टक्के काम झाले असून पोषण आहार योजनांचे कामही सुरू असल्याची माहिती दिली.