अजबच! स्वागत कमानीच्या बदल्यात बिअरबार परवान्याचा ठराव, कराड तालुक्यातील ग्रामपंचायतीचा कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 11:29 AM2022-07-23T11:29:51+5:302022-07-23T11:30:28+5:30

कारभाराचे कौतुक करावं तेवढं थोडंच!

Resolution of bear bar license in lieu of welcome arch, Administration of Gram Panchayat in Karad Taluka | अजबच! स्वागत कमानीच्या बदल्यात बिअरबार परवान्याचा ठराव, कराड तालुक्यातील ग्रामपंचायतीचा कारभार

अजबच! स्वागत कमानीच्या बदल्यात बिअरबार परवान्याचा ठराव, कराड तालुक्यातील ग्रामपंचायतीचा कारभार

googlenewsNext

प्रमोद सुकरे

कराड : अलीकडच्या काही वर्षात ग्रामपंचायतींना जादा अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे सरपंच व सदस्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. पण हे गाव कारभारी अनेकदा अधिकाराचा गैरवापर करताना दिसतात. याचे उत्तम उदाहरण म्हणून विरवडे ता.कराड ग्रामपंचायतीकडे पहावे लागेल. त्यांनी चक्क ओगलेवाडी गावठाण क्षेत्रात बियरबार ला परवानगी देण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्या बदल्यात संबंधित व्यक्तीने गावची स्वागत कमान बांधून देण्याची व त्याच्या मिळकतीतून रस्ता करून देण्याची अट घातली आहे. विशेष म्हणजे या साऱ्याचा प्रोसिडिंगवर सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे. आता अशा या कारभाराचे कौतुक करावं तेवढं थोडंच!

वास्तविक ओगलेवाडी हे स्वतंत्र गावठाण आहे. १९७५ सालीच त्याचे तसे गॅझेट झाले आहे. त्यानंतर कमी जास्त पत्रक प्रसिद्ध होऊन विरवडे मधून ओगलेवाडीतील सदरचे सर्वे नंबर त्याचवेळी कमी करण्यात आले आहेत. असे असताना ओगलेवाडी गावठाणचा विरवडे ग्रामपंचायतीशी  कसलाही संबंध उरत नाही. तरी देखील 'आयजी'च्या जीवावर 'बायजी' उदार या उक्तीप्रमाणे विरवडे ग्रामपंचायतीने परवानगीचा ठराव मंजूर केलेला दिसत आहे.

विशेष म्हणजे हा ठराव करताना ग्रामपंचायतीने काही अटी घातल्या आहेत. त्या म्हणजे या ठरावाच्या बदल्यात संबंधित व्यक्तीने गावची स्वागत कमान बांधून द्यायची आहे. शिवाय त्या मिळकतीतून २० फुटाचा गावासाठी रस्ता द्यायचा आहे .या अटी घालून ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. पण आपणाला तसा अधिकार आहे का? कायद्यामध्ये हे बसते का? याचा विचार कोठेही करण्यात आलेला दिसत नाही.
जप्त जागेची ८ अ ला नोंद कशी?

वास्तविक ज्या जागेत बियरबारला परवानगी देण्यात येत आहे ती जागा १७/६/ २००४ पासून एका कंपनीकडे जप्त आहे. अशा जागेची नव्याने ग्रामपंचायतीने ८ अ ला नोंद कशी काय धरली ?याचे आश्चर्य वाटत आहे. तसेच ज्याला बिअर बारची परवानगी दिली जात आहे त्या पर जिल्ह्यातील व्यक्तीचे ग्रामपंचायतीने येथे वास्तव्य कधी पाहिले ?हे सुद्धा समजत नाही.

सामेलिकरण व विभाजनाचे अनेक प्रकार

एखाद्या क्षेत्राचे सामेलीकरण किंवा विभाजन करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असतात .असे असताना विरवडे ग्रामपंचायतीने आजवर अनेक सामेलीकरण व विभाजनाचे प्रकार केले असल्याची चर्चा सध्या ओगलेवाडी ग्रामस्थांच्यात सुरू दिसत आहे.

अर्थपूर्ण व्यवहाराची चर्चा

खरंतर विरवडे व ओगलेवाडी गावठाण हे स्वतंत्र आहे. त्यामुळे विरवडे ग्रामपंचायतीला ओगलेवाडी गावठाण मध्ये अशा प्रकारचा परवाना देण्याचा अधिकार आहे का? हा मूळ प्रश्न आहे. तरी देखील ग्रामपंचायत अशा प्रकारचा ठराव करते.त्यामुळे यात अर्थपूर्ण व्यवहाराची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.

विरवडे ग्रामपंचायतिला ओगलेवाडी गावठाणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. तरीही बेकायदेशीरपणे त्यांचा हस्तक्षेप सुरू दिसतो. त्यांनी बियरबारला दिलेली परवानगी ही चुकीची असून त्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार आहे. - मुकुंद पाटील, ओगलेवाडी

Web Title: Resolution of bear bar license in lieu of welcome arch, Administration of Gram Panchayat in Karad Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.