एक कोटी सूर्यनमस्काराचा संकल्प
By admin | Published: January 27, 2015 10:46 PM2015-01-27T22:46:40+5:302015-01-28T00:57:06+5:30
यादिवशी सिटी हायस्कूल, पुरोहित कन्या व पटवर्धन हायस्कूलमधील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी तरुण भारत क्रीडांगणावर सूर्यनमस्कार घातले.
सांगली : सांगली शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांत वर्षभरात एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प सोडण्यात आला असून, या उपक्रमाला काल प्रजासत्ताक दिनापासून सुरुवात झाली. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतल्याचे संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर, जनार्दन लिमये यांनी सांगितले. सांगली शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता नुकतीच झाली. या काळात लेझीमच्या विश्वविक्रमासह गायन, साहित्य व नाट्य संमेलन असे विविध उपक्रम राबविण्यात आले. आजकाल मुले दूरचित्रवाणी पाहण्यास अधिक आणि खेळ, व्यायामास कमी वेळ देतात, अशी पालकांची ओरड असते. त्यासाठी शालेय दशेतच विद्यार्थ्यांत व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी संस्थेने सूर्यनमस्काराचा संकल्प सोडला आहे. २६ जानेवारी रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून त्याची सुरुवात करण्यात आली. यादिवशी सिटी हायस्कूल, पुरोहित कन्या व पटवर्धन हायस्कूलमधील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी तरुण भारत क्रीडांगणावर सूर्यनमस्कार घातले. तसेच मालू हायस्कूलचे बाराशे विद्यार्थीही सहभागी झाले होते. याशिवाय संस्थेच्या सर्व शाळांमध्ये त्या त्या ठिकाणीच सूर्यनमस्काराचा संकल्प केला आहे. दररोज दहा हजार विद्यार्थी या संकल्पात सहभागी होणार आहेत. आगामी दोनशे दिवसात एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा निर्धार संस्थेने केला आहे. (प्रतिनिधी)