४७ हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प : सरिता इंदलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:40 AM2021-04-02T04:40:57+5:302021-04-02T04:40:57+5:30
किडगाव : ‘पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. बाबाराजेंच्या प्रेरणेतून सातारा तालुक्यात ४७ हजार वृक्ष लागवड करण्याचा ...
किडगाव : ‘पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. बाबाराजेंच्या प्रेरणेतून सातारा तालुक्यात ४७ हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या वृक्षारोपणाच्या चळवळीत वृक्षप्रेमी व गावागावातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद असून, येत्या काही महिन्यांत ४७ हजार वृक्षलागवड करून आपला संकल्प पूर्ण करणार आहे’, असे प्रतिपादन सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांनी केले.
नेले (ता. सातारा) येथे वृक्षारोपण संकल्पाच्या प्रारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन नेले ग्रामस्थांनी केले होते. रक्तदान शिबिरास माउली ब्लड बँक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सरिता इंदलकर म्हणाल्या, ‘बाबाराजेंनी तालुक्याच्या तळागाळातील विकासकामे करून लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहेत. मला राजकीय नेतृत्वात तालुक्याचे उच्च पद देऊन समाजसेवा करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या ऋणानुबंधनात राहून लोकांची सेवा करणार आहे.’
डॉ. गिरीश पेंढारकर म्हणाले, ‘कोरोना महामारीत तणावामध्येही सभापतींच्या कामाची समाजाला जाणीव आहे. या काळात रक्तदान व वृक्षारोपणाचा संकल्प स्तुत्य आहे. आपल्या कर्तबगार सभापती या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आहेत.
यावेळी कोविडयोद्धा म्हणून किडगाव विभागातील विविध गावचे पोलीसपाटील, पत्रकार, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर्स यांचा मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास नेले गावचे सरपंच रूपाली कांबळे, किडगावच्या सरपंच शुभांगी चोरगे, पर्यवेक्षिका सुलभा कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, सुदर्शनकुमार मेहता, डॉ. विनीत कुबेर, जहिर फरास, प्रभाकर पवार, बबन जाधव, सुरेश टिळेकर, आनंदा कांबळे, महादेव धोत्रे, बबन पाटील, विनोद शिंदे, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. इंद्रजित ढेंबरे यांनी प्रास्ताविक केले. मंगेश पाटील यांनी आभार मानले.
फोटो. सातारा तालुक्यात ४७ हजार वृक्ष लागवडीचा प्रारंभ करताना सभापती सरिता इंदलकर व इतर मान्यवर.