सुभानमंगल किल्ल्याच्या जागी स्मारक उभारण्याचा ठराव
By admin | Published: December 25, 2016 11:41 PM2016-12-25T23:41:39+5:302016-12-25T23:41:39+5:30
पंचायत समिती सभा : चौपदरीकरणाचे काम गतीने करण्याची मागणी
खंडाळा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली लढाई झालेले ऐतिहासिक ठिकाण असलेल्या शिरवळच्या ‘सुभानमंगल’ किल्ल्याच्या जागी राज्य संरक्षित स्मारक उभारण्यात यावे, असा ठराव खंडाळा पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. त्याचबरोबर तालुक्यातील विविध विकासकामे आचारसंहितेपूर्वी मार्गी लावावीत,’ अशा सूचना सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना सभापती नितीन भरगुडे-पाटील यांनी केल्या.
खंडाळा पंचायत समितीची मासिक सभा सभापती नितीन भरगुडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती सारिका माने, सदस्य दीपाली साळुंखे, रमेश धायगुडे-पाटील, अनिता शेळके, जिल्हा परिषद मोहीम अधिकारी बापूसाहेब शेळके, गटविकास अधिकारी दीपा बापट आदींसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील शिरवळ-लोणंद रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे ठप्प आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रोज एकाचा तरी जीव जातोच, चौपदरीकरणाचे काम तातडीने झाल्यास भविष्यात जीवितहानी कमी होणार नाही. यावर सभेत चर्चा करण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन होऊन त्यांना तातडीने मोबदला द्यावा यासाठी महसूल व पुनर्वसन अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करावी. रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी सदस्य रमेश धायगुडे यांनी केली.
तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती प्रक्रिया नियमाप्रमाणे राबविण्यात यावी तसेच यापुढे कडबाकुट्टी, सायकल, शिलाई मशीन या वस्तू लाभार्थींना न देता त्यांनी खरेदी करावयाच्या आहेत. त्याची अनुदान रक्कम खात्यावर जमा करण्यात
येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती देण्यात आली.
शिरवळ येथील अंबिकामाता मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा, अशीही मागणी करण्यात आली तसेच शालेय साहित्याचे वाटपही करण्यात
आले. (प्रतिनिधी)