Satara: कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 01:14 PM2024-12-10T13:14:16+5:302024-12-10T13:15:19+5:30
कऱ्हाड (जि. सातारा ) : इलेक्ट्रानिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमवर होणारे मतदान संशयास्पद असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यावर आमचा ...
कऱ्हाड (जि. सातारा) : इलेक्ट्रानिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमवर होणारे मतदान संशयास्पद असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आगामी सर्व निवडणुका ईव्हीएम नव्हे, तर मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान घ्यावे, या मागणीचा ठराव कोळेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या करण्यात आला.
कोळेवाडी (ता. कऱ्हाड) येथे सोमवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतलेल्या ठरावाची प्रत प्रसिद्धीसाठी दिली आहे. यावेळी ग्रामस्थ म्हणाले, भारतात संसदीय लोकशाही आहे. लोकशाहीत निवडणूक आणि मतदान प्रक्रिया ही संवैधानिक प्रक्रिया आहे. यापूर्वी मतपत्रिकेवर मतदान घेतले जात होते. त्यावेळी आतासारखा मतदानात संशयकल्लोळ कधीच झाला नाही. सध्याचे मतदान, निकाल व त्यावर संशयास्पद मतमतांतरे अशा अनेक बाबी संशयाच्या घेऱ्यात अडकल्याचे दिसत आहे. हे लोकशाहीला मारक आहे.
काही वर्षांपासून ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अलीकडेच देशभरात ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात का सापडली आहे. यासाठी खुल्या मनाने व संशयविरहित मतदान निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे. सर्वांचा मतपत्रिकेवर मतदान या प्रक्रियेवर विश्वास आहे. म्हणून भविष्यात वेळखाऊ प्रक्रिया असली तरीही मतपत्रिकेद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी या ठरावाद्वारे आम्ही केली आहे.
विधानसभा निवडणुकीला कोळेवाडीत ईव्हीएम मशीनवर आम्हीही मतदान केले आहे; पण झालेल्या मतदानात कुछ तो गडबड है, असे आमचे ठाम मत आहे. त्यामुळे आमचा ईव्हीएमवरील मतदान पद्धतीवर विश्वास नाही. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे, ही आमची मागणी आहे. - वसंत भोसले, माजी सरपंच, कोळेवाडी.