दिव्यांग मुलांसह ग्रामस्थांकडून वॉटर कप जिंकण्याचा संकल्प
By admin | Published: April 10, 2017 04:39 PM2017-04-10T16:39:09+5:302017-04-10T16:39:09+5:30
माण तालुका : पिंगळी खुर्द येथे कामाला सुरुवात; कुदळ अन फावडे हाती घेऊन जनजागृती
आॅनलाईन लोकमत
दहिवडी , जि. सातारा, दि. १0 : माण तालुक्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेने भाग घेतला आहे. सहभागी गावांनी वॉटर कप जिंकण्याचा निर्धार करून श्रमदानाद्वारे जलसंधारण व मृदसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू केली आहेत. पिंगळी खुर्द, ता. माण येथेही दिव्यांग मुलांसह ग्रामस्थांनी वॉटर कप जिंकण्याचा संकल्पच केला आहे.
दहिवडी येथील दिव्यांग मुलांनी ग्रामस्थांना पाण्यासाठी एकत्र येण्याचे भावनिक आवाहन केल्यानंतर पिंगळी खुर्द येथील महिला, मुले, ग्रामस्थांनी गावातून हातात कुदळ, फावडे, घमेले घेऊन फेरी काढत जनजागृती करत श्रमदान केले. यावेळी प्रल्हाद देवकुळे, मुख्याध्यापक श्रीराम गोफणे यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी वर्गही सहभागी झाला होता.
माण तालुक्यातील ३२ गावांनी वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला असून, गावे पाणीदार करण्यासाठी चढाओढ लागली आहे. स्वयंस्फूर्तीने ग्रामस्थ एकत्र येऊन लहान मुलांपासून आबालवृद्धांनी कामाला सुरुवात केली आहे. तरुण, तरुणी, महिला वर्ग कामाला लागला आहे.
माणचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर, गटविकास अधिकारी रवींद्रकुमार सांगळे हे सहभागी गावात स्वत: श्रमदान करून मार्गदर्शन करत आहेत. डॉ. माधवराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलेल्या गावात नवचेतना शिबिरे घेऊन लोकांमध्ये एकोपा निर्माण करण्यात येत आहे. तसेच पाणी चळवळीचे महत्त्व सांगून चांगल्या पद्धतीने समाज प्रबोधन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
पाणी चळवळीचे महत्त्व...
पाणी फाउंडेशनचे समन्वयक अजित पवार, डॉ. प्रदीप पोळ हे वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलेल्या गावागावांत जाऊन ग्रामस्थांना बहुमोल मार्गदर्शन करत आहेत. हिवरे, ता. कोरेगाव येथे प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी गावागावांत जाऊन पाणी चळवळीचे महत्त्व गावकऱ्यांना समजावून सांगत असल्याने ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.