वहागाव प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्न तातडीने सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:41+5:302021-03-04T05:14:41+5:30

सातारा : कुडाळी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणाऱ्या महू धरणातील पूर्ण बाधित वहागाव प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी काल शासकीय कार्यालयात आक्रोश ...

Resolve the remaining issues of Wahagaon project victims immediately | वहागाव प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्न तातडीने सोडवा

वहागाव प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्न तातडीने सोडवा

Next

सातारा : कुडाळी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणाऱ्या महू धरणातील पूर्ण बाधित वहागाव प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी काल शासकीय कार्यालयात आक्रोश केला. पंधरा दिवसांत उर्वरित प्रश्न सोडवले नाहीत तर आम्ही धरणाचे काम बंद करू, अशा इशाऱ्याचे निवेदन कार्यकारी अभियंता सातारा यांना दिले आहे. त्यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा करून आपले गाऱ्हाणे मांडले.

कार्यकारी अभियंता धोम कालवे विभाग क्रमांक २, कृष्णानगर, सातारा यांना सर्व ग्रामस्थांनी जाऊन प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे, २० वर्षे झाली, आमच्या जमिनी संपादित केल्या असून, अजूनही काही प्रकल्पग्रस्तांना त्याचा मोबदला मिळाला नाही, हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल. शासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. अनेकांचे प्रश्न प्रलंबित असताना पाणी अडवले, यामुळे आमची २३ घरे पाण्याखाली गेली. सदर घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. कृष्णा खोरे वगळता शासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी अद्याप कुठल्याही प्रकारची मदत तर केली नाहीच, तर साधी चौकशी देखील करू शकले नाहीत. ज्यांना शेतजमीन मिळाली आहे ती व्यवस्थित मोजमाप नाही. त्यात अनेक त्रुटी आहेत. घराच्या भूखंडात अनेक अडचणी आहेत. काही सुधारणा करून जमीन मिळणे बाकी आहे. काहींना खडकाळ जमिनी मिळाल्याने त्यांनी बदली प्रस्ताव सादर केला आहे. त्यांना जमीन पसंत करून मिळाल्या नाहीत. या सर्व प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवले आहे. ज्यांना पर्यायी निवारा शेड दिले आहे, त्यामध्ये पाणी आहे. त्यात राहणे शक्य नाही. ज्या कुटुंबाच्या घराची वीज खंडित केली आहे, त्यांना रात्रीचे घरात राहणे अवघड झाले आहे. याबाबत सर्व खात्यांना आमच्या प्रश्नांची माहिती असूनही पाणी अडवून प्रकल्पग्रस्तांचे जगणे अवघड केले आहे.

जर हे प्रश्न सोडवले नाहीत तर आम्ही धरणग्रस्त धरणाचे काम बंद पाडणार असल्याचे शेवटी म्हटले आहे.

यावेळी वहागावचे उपसरपंच अरुण रांजणे, सदस्य मुक्ता चिकणे, विनोद कांबळे, संतोष शिराळे, तसेच लक्ष्मण रांजणे, ज्ञानेश्वर रांजणे, मोतीराम गुरव, रमेश रांजणे, शिवराम रांजणे, संतोष रांजणे, बबन रांजणे, नारायण रांजणे, सीताराम गुरव, अजित गुरव व धरणग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट :

या सर्व मागण्यांसंदर्भात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत याबाबत ठराव घेतला असून, जर लवकरात लवकर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर सर्व ग्रामस्थ धरणावर ठिय्या देऊन धरणाचे काम बंद पाडतील, असा ठराव केला आहे.

मागण्या.....

* प्रकल्पग्रस्त कोट्यातून प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे.

* पुनर्वसित ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतील खास बाब म्हणून घरे बांधून मिळावित.

* खातेदारांना खडकाळ व नापीक जमिनींचे बदली प्रस्ताव विचार करून तातडीने पिकाऊ जमिनी देण्यात याव्यात.

* धरणग्रस्त दाखला सुलभतेने मिळावा.

* संकलन दुरुस्तीच्या कामांना होत असलेला विलंब थांबवावा व संकलन दुरुस्ती त्वरित करावी.

* खातेदारांना शेतजमीन, घरांसाठी भूखंड भेटला नाही त्यांना त्वरित भूखंड मिळावा.

* ज्यांना शेतजमीन मिळाली आहे परंतु कब्जे पट्टीवर हद्द नसल्यामुळे ताबा नाही, त्यांना फेरमोजणी करून मिळावी.

* ज्यांना शेतजमिनीवर जाण्यास अडचण आहे त्यांना रस्ता मिळावा.

* काहींना जमिनी मिळाल्या; परंतु मूळ मालक दमदाटी करून ताबा देत नाहीत, त्यांना त्या मिळाव्यात.

Web Title: Resolve the remaining issues of Wahagaon project victims immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.