कऱ्हाडात घरपोच सेवेच्या पासला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:41 AM2021-05-06T04:41:25+5:302021-05-06T04:41:25+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे किराणा, दूध, भाजीपाला विक्री यासह सर्व खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने बंद ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे किराणा, दूध, भाजीपाला विक्री यासह सर्व खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, भाजी, किराणासह इतर आवश्यक वस्तू सकाळी सात ते अकरा घरपोहोच देण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठीचे पास पालिकेकडून देण्यात येत आहेत. किराणा दुकानदार व कामगार असे दोन पास देण्यात येणार आहेत. त्यासाठी शॉपअॅक्ट लायसन्स किंवा एखाद्या शासकीय योजनेतून अथवा बँकेतून व्यवसायासाठी कर्ज घेतल्याचा पुरावा, कोरोना तपासणी अहवाल, ओळखीचा पुरावा, दुकानदार व कामगारांचे तीन फोटो अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या विक्रेत्यास पालिकेकडून घरपोहोच साहित्याचा पास देण्यात येत आहे. मंगळवारी दिवसभरात पालिकेतून सुमारे तीनशे विक्रेत्यांनी अर्ज नेले आहेत.
दरम्यान, पास नेण्यासाठी विक्रेत्यांची गर्दी होऊ नये आणि सोशल डिस्टंन्सिंग रहावे यासाठी पालिकेच्या आवारात मंडप घालण्यात आला आहे. एका दुकानदारास व कामगारास पास देण्यात येत आहे. प्रत्येक विक्रेत्याकडे तपासणी अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सकाळी सात ते अकरा या वेळेत साहित्य घरपोहोच करता येणार आहे.