ढेबेवाडी येथे जनता कर्फ्यूला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:35 AM2021-04-26T04:35:28+5:302021-04-26T04:35:28+5:30
तळमावले : ढेबेवाडी आणि तळमावले बाजारपेठेत संचारबंदी असतानाही ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत होते. परिणामी विभागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची ...
तळमावले : ढेबेवाडी आणि तळमावले बाजारपेठेत संचारबंदी असतानाही ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत होते. परिणामी विभागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमालीची वाढली होती. त्यामुळे बुधवारपासून जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. याबाबत ढेबेवाडी, मंद्रुळकोळे व तळमावले ग्रामपंचायतीने कडक अंमलबजावणीच्या सूचना दिल्या असून ग्रामस्थही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. जनता कर्फ्युमुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद असल्यामुळे गर्दीवरही नियंत्रण आले आहे. ग्रामस्थांनी प्रशासकीय नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी केले आहे.
चारुदत्त साळुंखे यांचा कऱ्हाडमध्ये सत्कार
कऱ्हाड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत चाफळ येथील चारुदत्त साळुंखे यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला. त्याबद्दल सातारा जिल्हा सेवानिवृत्त महसूल अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने निवृत्त नायब तहसीलदार बी.एम. गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष जे.सी. साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. बी.एम. गायकवाड यांनी चारुदत्त साळुंखे यांचे यश युवा पिढीला मार्गदर्शक आणि दिशा देणारे ठरेल, असे मत व्यक्त केले.
नाईकबा यात्रेत पोलिसांना सहकार्य
ढेबेवाडी : बनपुरी, ता. पाटण येथील नाईकबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याने यात्रास्थळी व परिसरात रात्रंदिवस बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बनपुरी येथील संजीवनी फुड्सचे अभय पवार यांनी नाचणीचे पौष्टिक खाद्यपदार्थ व पाण्याच्या बाटल्या तर नानासाहेब साबळे यांनीही खाद्यपदार्थ पुरवून सामाजिक बांधिलकी जपली. उन्हातान्हात सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सामाजिक जाणिवेतून केलेल्या सहकार्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. या वेळी अभय पवार, शुभांगी पवार, नानासाहेब साबळे, माजी उपसरपंच शिवाजी पवार, यात्रा समितीचे अध्यक्ष शहाजी भिलारे, प्रमोद पाटील उपस्थित होते.
बनवडी येथील जागृती विद्यामंदिरचे यश
कोपर्डे हवेली : बनवडी, ता. कऱ्हाड येथील जागृती विद्यामंदिर व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अबॅकस स्पर्धेत यश मिळवले. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यालयाची विद्यार्थिनी राजनंदिनी जाधव, संस्कार खापे, क्षितिज गवते, अवधूत माने, हर्षदा माने यांनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष शंकरराव खापे, मुख्याध्यापक सुधाकर चव्हाण तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.