फलटण तालुक्यात वीकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:37 AM2021-04-11T04:37:55+5:302021-04-11T04:37:55+5:30
फलटण : फलटण शहर व तालुक्यात वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होत. जे मुद्दामपणे ...
फलटण : फलटण शहर व तालुक्यात वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होत. जे मुद्दामपणे बाहेर फिरत होते, त्यांना पोलीस घरी पाठविताना दिसत होते. सर्वसामान्य नागरिकांनी विकेंडला चांगला प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र शासनाने शनिवार व रविवार कडक लॉकडाऊन जाहीर केल्याने, शुक्रवारीच नागरिकांनी किराणामाल, भाजी मंडई, मेडिकलमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती. शुक्रवारी दिवसभर सर्वत्र वर्दळ दिसत होती. रात्री सहानंतर सर्व दुकाने बंद व्हायला लागली, तसतसे नागरिकांची रस्त्यावरून गर्दी कमी झाली होती. रात्री आठनंतर तर कोणीच रस्त्यावर दिसत नव्हते. शनिवारपासून कडक लॉकडाऊन असल्याने घराबाहेर कोणीच पडले नाही. काही तरुण मुद्दामहून बाहेर पडलेले दिसले. पोलीस त्यांना हाकलून लावत होते. रस्त्यावरूनही अतिशय अल्प प्रमाणात वाहतूक सुरू होती.
फलटण-पुणे, फलटण-पंढरपूर, फलटण-सातारा या रस्त्यावर अत्यंत कमी वाहतूक दिसून आली. शहरात सर्वत्र, तसेच ग्रामीण भागात पोलीस ठिकठिकाणी पेट्रोलिंग करताना दिसत होते. फलटण तालुक्यात कोरोना रुग्णांची दररोजची शंभरची सरासरी धडकी भरवणारी आहे. फलटण तालुक्यात कोरोना रुग्णांसाठी एकही बेड शिल्लक नाही. बेडसाठी रुग्ण धावाधाव करताना दिसत आहेत. वाढत जाणारी रुग्णांची साखळी तोडण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी पुढाकार घेत शनिवार व रविवारच्या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला.
फलटण बस स्थानकावरून अल्प प्रमाणात बसेस धावताना दिसत होत्या. प्रवाशांचाही अत्यल्प प्रतिसाद दिसला. लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी शासकीय अधिकारी व पोलीस सतर्कपणे काम करताना दिसत आहेत. मेडिकल, हॉस्पिटल उघडे होते, तरीही नागरिक तिकडे फारसे फिरकलेच नाहीत.
फोटो आहे...
\\\\\\\\\\\\\\\\\\\