रिझर्व्ह बँकेकडून सहकारी बँकांवरील निर्बंध धोकादायक - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:39 PM2024-09-23T12:39:59+5:302024-09-23T12:40:40+5:30

सातारा प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार प्रेरणादायी

Restrictions on Cooperative Banks by Reserve Bank Dangerous - Sharad Pawar  | रिझर्व्ह बँकेकडून सहकारी बँकांवरील निर्बंध धोकादायक - शरद पवार 

रिझर्व्ह बँकेकडून सहकारी बँकांवरील निर्बंध धोकादायक - शरद पवार 

सातारा : राज्यातील पाचशेपेक्षा जास्त सहकारी बँका बंद झाल्या असताना प्राथमिक शिक्षक बँकेची दमदार वाटचाल इतर बँकांसाठी प्रेरणादायी आहे. तथापि, अडचणीतील बँकांना आधार देण्याएवजी रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लावले जातात, हे सहकारासाठी धोकादायक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

सातारा येथे रविवारी प्राथमिक शिक्षक बँकेच्या शतकमहोत्सवी समारंभात ते बोलत होते. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार जयंत आसगावकर, शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे, अध्यक्ष किरण यादव, उपाध्यक्ष शहाजी खाडे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक उपस्थित होते.

खासदार पवार म्हणाले, ‘सहकारात उठावदार कामगिरी करण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मात्र, सध्या सहकार क्षेत्र अडचणीत आणण्याचे उद्योग सुरू आहेत. अडचणीतील संस्थांना आधार देण्याऐवजी निर्बंध लादून अडचणी वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावण्याबाबत दुमत नाही, मात्र ज्या बँका पुन्हा स्थिरस्थावर होऊ शकतात त्यांना सहकार्यही केले पाहिजे. सातारची प्राथमिक शिक्षक बँक कर्ज वितरण व वसुलीमध्ये अग्रेसर आहे. शिक्षकांची आधारवड बनत असताना सभासदांच्या पाल्यांनाही शिक्षणासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देऊन बँकेने भावी पिढी घडवण्याचेच काम चालवले आहे.’

चोख कारभारासाठी महिलांना संधी हवी

कृ. बा. बाबर यांनी सुरू केलेल्या बँकेचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण झाले आहे. त्यांच्या कन्या सरोजिनी बाबर व आम्ही विधानमंडळात एकत्र काम केले आहे. प्राथमिक शिक्षक बँकेने दोन महिलांना संचालकपदाची संधी दिल्याचे समाधान आहे. ही संधी उपलब्ध करून देण्यात आमचाच वाटा आहे. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांचाच नसून सर्वांना संधी मिळाली पाहिजे. महिलांना सहभागी केल्यास आणखी चोख व्यवहार होईल, असेही पवार यांनी सांगितले.

Web Title: Restrictions on Cooperative Banks by Reserve Bank Dangerous - Sharad Pawar 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.