कोरोना रोखण्यासाठी निर्बंधाची अंमलबजावणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:26+5:302021-06-28T04:26:26+5:30
पाटण : ‘कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नसताना तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्याची पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. मागील ...
पाटण : ‘कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नसताना तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्याची पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. मागील आठवड्यापासून निर्बंध कमी केल्याने ठिकठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबाजवणी करावी,’ अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.
पाटण तालुक्यातील कोरोनाबाधितांच्यावर करण्यात येणारे उपचार व वाढत्या कोरोना संख्येला रोखण्याकरिता दौलतनगर ता. पाटण येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या वेळी ते बोलत होते. बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, तहसीलदार योगेश टोमपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, डॉ. श्रीनिवास बर्गे, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, ढेबेवाडीचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, मल्हारपेठचे सहायक पोलीस निरीक्षक पाटील, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी डॉ. दीपक कुऱ्हाडे, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, डॉ. सोहेल शिकलगार उपस्थित होते.
शंभूराज देसाई म्हणाले, ‘कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करायच्यात. दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नसताना ब्रेक द चेन अंतर्गत दोन आठवड्यांपासून वेगवेगळ्या पातळीवर निर्बंध शिथिल करत आणले आहेत. त्यामुळे बाजारपेठांच्या ठिकाणी, विविध दुकानांमध्ये खरेदी करण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत असल्याने कोरोना संसर्ग पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून निर्बंधाची अंमलबजावणी करावी. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर तालुका प्रशासनाने शासनाच्या निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रत्येक गावातील ग्रामस्तरीय समिती सक्रिय करण्याचे काम करावे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करण्याची मोहीम तालुका प्रशासनाने हाती घ्यावी. त्यानुसार ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेत तालुका प्रशासनाने दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे कार्य केल्यास नक्कीच कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल.
पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये तालुक्यातील कोरोनाबाधितांवर चांगले उपचार मिळत आहेत.
चौकट
लग्न समारंभावर लक्ष ठेवा
या सेंटरमध्ये औषधोपचाराकरिता काही आवश्यकता लागली तर याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. अत्यावश्यक सेवासह काही बाबींना लॉकडाऊनमधून सूट दिली असली तरी विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस विभागाने कारवाई करावी. लग्न समारंभ, हॉटेलमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होत आहे का यावरही लक्ष ठेवत गर्दी टाळण्याकरिता तालुक्यातील पोलीस यंत्रणेने सतर्क राहावे, असे आवाहनही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.