जिल्हा परिषदेत चहाच्या तलफवर निर्बंध...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:15 AM2021-03-04T05:15:08+5:302021-03-04T05:15:08+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोना स्थिती वाढत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या असतानाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ...
सातारा : जिल्ह्यात कोरोना स्थिती वाढत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या असतानाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनीही अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार कोणालाही आता चहापानासाठी बाहेर जाता येणार नाही तसेच शरीराचे तापमान तपासूनच जिल्हा परिषदेत प्रवेश करावा लागणार आहे.
जिल्ह्यात मागील ११ महिन्यांपासून कोरोनाचे सावट आहे. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लॉकडाऊन सुरू होता. जवळपास सात महिने सर्व व्यवहार बंद होते. त्यानंतर कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने नियम व निर्बंध कमी करण्यात आले. सध्या मात्र, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागलेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी काही सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या सूचनांचे पालन करावे लागणार आहे.
चौकट :
अशा आहेत सूचना...
- अधिकारी, कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती; पण सामाजिक अंतर पाळणे आवश्यक
- कार्यालय व आवारातही तोंड आणि नाकावर मास्क असणे आवश्यकच
- कार्यालयात प्रवेश करताना सॅनिटायझरचा वापर व शरीराचे तापमान तपासणे महत्त्वाचे
- कोरोनामुळे चहासाठी बाहेर जाऊ नये; कार्यालयीन वेळेत दिलेली जबाबदारी पार पाडणे
- विभागप्रमुखांनी कोरोनाबाबत काही निदर्शनास आल्यास कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करणे
- आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईस पात्र राहाल, असा इशारा
..................................................