रेठरे बुद्रूक सोसायटी : खत विभागात तेवीस लाखाचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 11:28 AM2021-03-23T11:28:18+5:302021-03-23T11:30:27+5:30
fraud Crimenews Satara karad- रेठरे बुद्रूक, ( ता. कऱ्हाड ) येथील विकास सोसायटीच्या खत विभागात २०१२ ते २०१५ या कालावधीत २३ लाख ५४ हजार ७६७ रुपयांचा अपहार झाल्याचे फेरलेखा परिक्षणात आढळून आले आहे. याबाबत उपलेखापरिक्षक रोहीत सुर्यवंशी यांनी कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात तत्कालिन खत विभाग प्रमुखाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
कऱ्हाड : रेठरे बुद्रूक, ( ता. कऱ्हाड ) येथील विकास सोसायटीच्या खत विभागात २०१२ ते २०१५ या कालावधीत २३ लाख ५४ हजार ७६७ रुपयांचा अपहार झाल्याचे फेरलेखा परिक्षणात आढळून आले आहे. याबाबत उपलेखापरिक्षक रोहीत सुर्यवंशी यांनी कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात तत्कालिन खत विभाग प्रमुखाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
दिनकर बाळकृष्ण सोमदे (रा. रेठरे बुद्रूक) असे गुन्हा दाखल झालेल्या तत्कालिन खत विभाग प्रमुखाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेठरे बुद्रूक येथील विकास सेवा सोसायटीच्या खत विभागात दिनकर सोमदे हा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होता.
त्यावेळी सोसायटीच्या खत विभागाचे १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीतील लेखा परिक्षण करण्याचे आदेश १० नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हा उपनिबंधकांनी दिले होते. या आदेशानुसार उपलेखा परिक्षक रोहीम सुर्यवंशी यांनी लेखा परिक्षणाचे काम पूर्ण केले असून फेर लेखा परिक्षणाअंती दिनकर सोमदे याने २३ लाख ५४ हजार ७६७ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.
२०१२ ते २०१५ या कालावधीतील रोख विक्री पुस्तक ते विक्री रजिस्टर तपासणी करीत असताना ६ लाख २६ हजार ३०४ एवढी रक्कम लेखा परिक्षकांच्या निदर्शनास आली आहे. तर उधार विक्री पावती दर आणि रोख विक्री पावती दर यामध्ये तफावत आढळून आली आहे.
उधार विक्री दरापेक्षा रोखीने विक्री केलेल्या पावत्या या कमी दराने काढलेल्या असून फरकाची रक्कम अपहारीत असल्याचे लेखा परिक्षकांचे म्हणणे आहे. तसेच या कालावधीतील नावे व्हाऊचर तपासणी करीत असताना निदर्शनास आलेली रक्कम १७ लाख २८ हजार ४६३ एवढी आहे.
रोजकिर्दीला रोखीने वाहतूक खर्चाची बिले खर्ची पडली असून नमूद वाहतूक व्हाऊचरसोबत वाहतुकीची बिले उपलब्ध नसल्यामुळे सदरच्या फरकाची रक्कम ही अपहारीत रक्कम असल्याचे लेखा परिक्षकांनी फिर्यादीत नमूद केले आहे.