शाळेत रंगला स्कूल रिक्षावाल्याचा सेवानिवृत्त सोहळा
By Admin | Published: September 3, 2016 05:11 PM2016-09-03T17:11:37+5:302016-09-03T17:12:06+5:30
गेली ३५ वर्षे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना रोज ने-आण करणा-या रिक्षावाल्याचा सेवानिवृत्त समारंभ अत्यंत भावनिकरीत्या साजरा झाला
>- साईं सावंत / ऑनलाइन लोकमत
नियम बाजूला ठेवून जपला ॠणानुबंध; ३५ वर्षांची सेवा संपविताना डोळ्यात पाणी
सातारा, दि. 3 - मुख्याध्यापकांचा सेवानिवृत्त सोहळा तसा प्रत्येक शाळेत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र, गेली ३५ वर्षे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना रोज ने-आण करणा-या रिक्षावाल्याचा सेवानिवृत्त समारंभ अत्यंत भावनिकरीत्या साजरा झाला. साता-यातील नवीन मराठी शाळेत सर्वच्या सर्व म्हणजे ४५ शिक्षक अन् शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या रिक्षावाल्याकाकांना निरोप देण्यात आला. शाळेने सर्व नियम बाजूला ठेवून हा जपलेल्या या आगळ्या-वेगळ्या ऋणानुबंधांने ३५ वर्षांची सेवा संपविताना रिक्षावाल्याकाकांचे डोळे आनंदाश्रूने पाणावले.
साता-यात राहणारे चंद्रशेखर गाडगीळ १९८२ पासून रिक्षा चालवित आहे. ते गेल्या ३५ वर्षांपासून नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची आपल्या रिक्षामध्ये ने-आण करत होते. वार्धक्यामुळे आता हे काम करणे शक्य होत नसल्याने दि. ३ सप्टेंबर रोजी त्यांनी आपल्या पस्तीस वर्षांच्या अखंडित सेवेला पूर्णविराम दिला. या पस्तीस वर्षांच्या कालावधीत चंद्रशेखर गाडगीळ यांनी अनेक विद्यार्थ्यांना लहानाचे मोठे होताना पाहिले.
आपल्या लाडक्या काकांचा यशोचित सत्कार व्हावा, या उद्देशाने नवीन मराठी शाळेचे मुुख्याध्यापक, ४५ शिक्षक-शिक्षिका, सेवक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत गाडगीळ काकांना सपत्नीक एका छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. या शाळेने जपलेल्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने गाडगीळ काकांसह उपस्थित प्रत्येकाला गहिवरून आले होते. ३५ वर्षांच्या कालावधीत ‘काका’ या ज्ञानमंदिरातील एक अविभाज्य घटक बनले.
रिक्षातील टेपवर मनाचे श्लोक
गाडगीळ काकांनी आपल्या रिक्षात इतर रिक्षांप्रमाणे टेप बसविला होता. सिनेमांची गाणी लावून टामपास करण्याऐवजी काकांनी या टेपचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पूरेपूर उपयोग करून घेतला. विद्यार्थी रिक्षात बसताच काका टेपवर मनाचे श्लोक, टिळकांच्या गोष्टी लावत असत. त्यामुळे मुुलांवर कळत-नकळत का होईना चांगले संस्कार होत गेले.