निवृत्त वनअधिकाऱ्याची आत्महत्या
By Admin | Published: February 20, 2015 10:40 PM2015-02-20T22:40:37+5:302015-02-20T23:11:17+5:30
मद्य आणि कीटकनाशकाचे मिश्रण प्राशन केल्याचा संशय
कोरेगाव : शहरातील एका लॉजच्या खोलीत निवृत्त उपवनसंरक्षक भारत दशरथ पारखे (वय ६२, रा. गोगावलेवाडी, ता. कोरेगाव) यांचा मृतदेह शुक्रवारी आढळून आला. पारखे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे न समजू शकल्याने मृत्यूचे गूढ वाढले आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत पारखे हे मूळचे हातीद, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील रहिवासी होते. त्यांनी वनसेवेत असताना गोगावलेवाडी (पुनर्वसित) येथे फार्म हाउस बांधले होते. सातारा येथे उपवनसंरक्षक आणि सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक म्हणून कार्यरत असताना ते नेहमीच गोगावलेवाडी येथे वास्तव्यास असत. नागपूर येथे मुख्य वनसंरक्षक म्हणून ते निवृत्त झाले. अधून-मधून ते गोगावलेवाडी येथे येत होते. बुधवारी सकाळी ते गोगावलेवाडी येथील फार्म हाउस येथे गेले होते. त्यानंतर रात्री ११ वाजता कोरेगावात आले आणि आझाद चौकातील एका लॉजमध्ये खोली घेतली होती. तेथे दोन दिवस त्यांनी मुक्काम केला. गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी लॉजच्या कर्मचाऱ्यांना ‘सकाळी सहाला मला उठवा,’ असे त्यांनी बजावले होते. त्यावेळी त्यांनी मद्यपान केले होते. लॉजमधील कर्मचाऱ्यांनी सकाळी सहाला त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना वाटले पारखे हे अजून झोपेत असावेत म्हणून त्यांनी पुन्हा एका तासाने दरवाजा ठोठावला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने अखेरीस व्यवस्थापक दिलीप घोरपडे याने मालकाला याची कल्पना दिली. त्यानंतर कोरेगाव पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली.याप्रकरणी लॉजचे व्यवस्थापक दिलीप घोरपडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे. हवालदार बी. आर. यादव व पोलीस नाईक राहुल गायकवाड तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
झोपलेल्या अवस्थेत मृतदेह !
पोलिसांनी लॉजमध्ये जाऊन पाहणी केली असता, खोलीचा दरवाजा आतून कडी लावून बंद असल्याचे लक्षात आले. त्यांनी दरवाजा तोडल्यानंतर पारखे यांचा झोपलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. खोलीची तपासणी केली असता, त्यामध्ये मद्याच्या बाटल्या आणि कीटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. पारखे यांनी मद्यामध्ये कीटकनाशक मिश्रण करून प्राशन केले असावे, असा पोलिसांना संशय आहे.