परतीच्या पावसाने पिकांना जीवदान

By admin | Published: September 23, 2015 10:20 PM2015-09-23T22:20:23+5:302015-09-24T00:05:31+5:30

चंद्रकांत पाटील : राज्याच्या पंचवीस हजार गावांमधील शेतकऱ्यांना दिलासा

Return to crops by returning rain | परतीच्या पावसाने पिकांना जीवदान

परतीच्या पावसाने पिकांना जीवदान

Next

कऱ्हाड : ‘गेल्या आठवड्यात मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या मोठ्या भागात झालेल्या परतीच्या पावसामुळे दुष्काळी परिस्थतीत सुधारणा झाली आहे. आठवड्यापूर्वी राज्यातील सुमारे २५ हजार गावे दुष्काळाच्या छायेत होती. नुकत्याच झालेल्या पावसामुळे यापैकी अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होईल,’ असे मत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.कऱ्हाड येथे एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत घेतलेल्या निर्णयाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. या निर्णयाप्रमाणे आता ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या ठिकाणीही दुष्काळ जाहीर करून तेथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. या निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. दुष्काळाची सर्वाधिक तीव्रता जाणवणाऱ्या मराठवाड्यात शेतकऱ्यांकडून खरीपाच्या तुलनेत रब्बी पिकेच मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. गेल्या आठवड्यात झालेला पाऊस तेथील रब्बी पिकांसाठी उपयुक्त ठरु शकेल. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देऊन चांगल्या उत्पादनासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे.
राज्यातील सहकार क्षेत्रात उघड होत असणाऱ्या भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांबाबत मत व्यक्त करताना पाटील यांनी सांगितले की, सहकारातील बजबजपुरी स्वच्छ करण्याची राज्य सरकारची मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. राज्यातील अनेक जिल्हा सहकारी बँका भ्रष्टाचाराची कुरणे बनल्या आहेत. त्यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर आरोपपत्रे दाखल करण्यात येतील. राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यातील सहभागींवर दोषारोपपत्र दाखल केले आहे. याबाबत कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतरच राज्य सरकारला याबाबत ठोस कारवाई करता येईल.
‘एफआरपी’प्रमाणे ऊसदर न देणाऱ्या साखर कारखान्यांवर सरकारने सातत्याने दबाव ठेवला आहे; परंतु याबाबत मर्यादेपेक्षा जास्त कठोर निर्णय घेतल्यास कारखाने बंद पडून शेतकऱ्यांचेच नुकसान होईल. म्हणून सरकार अतिशय सावधपणे साखर कारखान्यांना याबाबत सूचना करीत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना शासकीय महामंडळात संधी देणार आहोत. जिल्ह्यातील बाजार समिती संचालक मंडळातही शासकीय संचालक म्हणून काही कार्यकर्त्यांची वर्णी लावणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेसह सर्व पक्ष भाजपविरोधात एकवटत असले तरी तेथील महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. त्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, ताराबाई आघाडी तसेच आरपीआय भाजपसोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

...तर ‘सनातन’वर बंदी
सनातन संघटनेवर बंदी घालण्याबाबत विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, पानसरे हत्या प्रकरणात पकडण्यात आलेल्या संशयितांचा आणि सनातनचा थेट संबंध आढळून आल्यास अशा कारवाईस सरकार मागेपुढे पाहणार नाही. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यात सहभागी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.

Web Title: Return to crops by returning rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.