दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास वाहतूक कोंडीचा; कोल्हापूर-पुणे महामार्गावर प्रचंड गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 02:45 PM2022-10-30T14:45:18+5:302022-10-30T14:45:41+5:30
वेळे परिसरात खंबाटकी बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने या बोगद्यातून पाण्याचे पाट वाहू लागले आहेत.
- अभिनव पवार
दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेले चाकरमानी पुन्हा आपापल्या शहरात परतत असताना ट्रॅफिक जाम मुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असून नेहमीपेक्षा दिवाळीच्या सुट्ट्या संपल्याने महामार्गावर प्रचंड गर्दी होती. खड्ड्यात हरवलेल्या महामार्गावरून वाट शोधताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली होती. त्यामुळेच ठिकठिकाणी महामार्ग ट्रॅफिक जाम मध्ये अडकून पडला.
वेळे परिसरात खंबाटकी बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने या बोगद्यातून पाण्याचे पाट वाहू लागले आहेत. यामुळेच या बोगद्यातून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. परिणामी महामार्गावर वाहनांची गर्दी वाढून ट्रॅफिक जाम ची समस्या निर्माण होते.
खंबाटकी बोगद्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे रविवारी वेळे येथील महामार्गावर दुपारपासूनच भल्या मोठ्या वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली. या रांगा जवळपास तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाढल्या होत्या. कासव गतीने बोगद्यातून वाहतूक चालू होती व महामार्ग वाहनांच्या संख्येने प्रचंड फुलून गेला होता, त्यामुळेच वाहतूक कोंडी झाली होती.
वाहतूक अगदीच धिम्या गतीने पुढे सरकत होती. त्यामुळे परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तासनतास थांबून कासवगतीने पुढे सरकनाऱ्या वाहनांमुळे प्रवाशी मात्र अस्वस्थ झाले होते. काही वाहने बंद पडू लागली होती त्यामुळे देखील वाहतूक कोंडी आणखी वाढत होती.
प्रत्येक सणासुदीला महामार्गावर ट्रॅफिक जाम ची समस्या उद्भवत असते. याचा थेट परिणाम येथील स्थानिकांवर होत असतो. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वसलेल्या वेळे गावातील लहानथोर ग्रामस्थांना रस्ता ओलांडताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. परिणामी अपघात होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांची आवश्यक ती डागडुजी करून वेळे परिसरातील महामार्ग तात्काळ दुरुस्त करण्यास प्रथम प्राधान्य द्यावे असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.