परतीच्या पावसाने दाहकता कमी; तरीही एक लाख लोकांसाठी टॅंकर, पाणी टंचाई वाढणार

By नितीन काळेल | Published: October 17, 2023 11:22 PM2023-10-17T23:22:14+5:302023-10-17T23:22:28+5:30

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो.

Return rain reduces inflammation; Still tankers for one lakh people, water scarcity will increase | परतीच्या पावसाने दाहकता कमी; तरीही एक लाख लोकांसाठी टॅंकर, पाणी टंचाई वाढणार

परतीच्या पावसाने दाहकता कमी; तरीही एक लाख लोकांसाठी टॅंकर, पाणी टंचाई वाढणार

सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने काही प्रमाणात दिलासा दिल्याने टंचाईची दाहकता कमी झाली असलीतरी संकट कायम आहे. कारण, अजुनही ७८ गावे आणि ३५७ वाड्यांसाठी ८६ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यावर १ लाख १४ हजार नागरिक आणि ७५ हजार पशुधनाची तहान अवलंबून आहे. तर कमी पर्जन्यमानामुळे आगामी काळात टंचाई आणखी वाढणार आहे.

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावरच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. यंदा मात्र, या पावसाने सुरूवातीपासून निराशा केली. तर परतीच्या पावसानेही दगा दिला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी मोठे पाणी प्रकल्प भरलेले नाहीत. तर दुष्काळी भागातील पाझर तलावात ठणठणाट आहे. अनेक ओढ्यांना पाणी नाही. बंधारे कोरडे ठाक पडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील टंचाईची स्थिती कायम आहे. फक्त परतीचा पाऊस ज्या भागात झाला तेथील टॅंकर बंद झाले आहेत. एेवढाच दिलासा आहे. तरीही आगामी काळात संबंधित गावांना टॅंकर सुरू करावे लागणार आहेत. कारण, पाणीस्त्रोत कोरडे पडणार आहेत.

जिल्ह्यातील टॅंकरची संख्या १०० पर्यंत पोहोचली होती. परतीचा पाऊस काही भागात झाल्याने ही संख्या आता ८६ वर आली आहे. यामध्ये माण तालुक्यात टंचाई अधिक आहे. ३८ गावे आणि तब्बल ३०२ वाड्यांना टंचाई जाणवत आहे. यासाठी ५५ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या टॅंकरवर ६२ हजार नागरिक आणि ५१ हजारांवर पशुधनाची तहान अवलंबून आहे. पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, भाटकी, खडकी, धुळदेव, ढाकणी, कारखेल, वरकुटे-म्हसवड, हवालदारवाडी, रांजणी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटबाव, मार्डी, पर्यंती, इंजबाव, वारुगड, परकंदी, महिमानगड, पांढरवाडी, पिंगळी, विरळी, कुरणेवाडी आदी गावांना व त्याखालील वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

खटाव तालुक्यातही टंचाईची दाहकता आहे. २० गावे आणि २४ वाड्यांसाठी १४ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टॅंकरवर सुमारे २४ हजार नागरिक आणि सात हजार पशुधन अवलंबून आहेत. मांजरवाडी, मोळ, गारवडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, पडळ, धोंडेवाडी, दातेवाडीसाठी टॅंकर सुरू आहेत. फलटण तालुक्यातील ९ गावे आणि ३१ वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहेत. ११ टॅंकरवर १४ हजार नागरिकांबरोबरच १४ हजार पशुधनाचीही तहान अवलंबून आहे. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरूड, घाडगेमळा येथे टॅंकर सुरू आहेत. कोरेगाव तालुक्यातही ११ गावांतील १४ हजार ६९१ नागरिक आणि अडीच हजार पशुधनाला टॅंकरचा आधार आहे. यासाठी ६ टॅंकर सुरू आहेत. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी येथे टंचाई कायम आहे. तर जिल्ह्यातील इतर सात तालुक्यात टॅंकर सुरू नाहीत.

दुष्काळी तालुक्यातच बिकट स्थिती...
जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातच बिकट स्थिती आहे. त्यातच यापुढे पाऊस पडणार नाही. त्यामुळे पुढील आठ महिन्यांसाठीतरी टंचाई निवारणाचे नियोजन करावे लागणार आहे. कारण, काही दिवसांतच अनेक गावांतून टॅंकरची मागणी होणार आहे. उन्हाळ्यात तर टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. सध्या टंचाई निवारणासाठी टॅंकर सुरू आहेत. तसेच चार तालुक्यात १८ विहिरी आणि २८ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.
 

Web Title: Return rain reduces inflammation; Still tankers for one lakh people, water scarcity will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.