Satara News: कोल्हापूर नाक्यावर एकेरी मार्गातून उलटा प्रवास, वाहतूक ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 04:18 PM2023-02-24T16:18:36+5:302023-02-24T16:19:03+5:30

एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक कोंडी फुटली.

Reverse journey through one way at Kolhapur Nakka in karad Satara, traffic stopped | Satara News: कोल्हापूर नाक्यावर एकेरी मार्गातून उलटा प्रवास, वाहतूक ठप्प 

Satara News: कोल्हापूर नाक्यावर एकेरी मार्गातून उलटा प्रवास, वाहतूक ठप्प 

googlenewsNext

माणिक डोंगरे

मलकापूर : कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. अरुंद रस्त्यामुळे एकेरी मार्गातून उलट जाणाऱ्या ट्रॅक्टरची खासगी बसला घासाघासी झाली. पूर्वेकडील उपमार्गावर एकेरी मार्गातून उलटा प्रवास करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाच्या अंगलट आले. दोन्ही वाहने अडकल्याने एक तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांसह कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना घाम फुटला होता.

पुणे- बंगळुरू महामार्गावरचा येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. सहापदरीकरण कामाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. कोल्हापूर नाका ते कृष्णा रुग्णालय व कृष्णा रुग्णालय ते कोल्हापूर नाका या दोन्ही उपमार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, अनेकवेळा घाईघाईने शॉर्टकट मारण्यासाठी वाहनचालकांनी उलटा प्रवास करण्याचा सपाटाच लावला आहे. यामुळे अपघाताच्या शक्यता वाढल्या आहेत. 

आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास खासगी प्रवासी बस (एमएच ४८ एवाय १००५) ही प्रवासी घेऊन कऱ्हाडकडून कोल्हापूर दिशेला जात होती. पूर्वेकडील उपमार्गावर येथील बोराटे पेट्रोलपंपाजवळ आली असता समोरून उलट प्रवास करत आलेल्या ट्रॅक्टर (एमएच ०९ एफबी ९८१३) ची एकमेकाला घासाघासी झाली. दोन्ही वाहने पत्रा फाटून अडकल्यामुळे पुढेही जाता येईना आणि मागेही जाता येईना, अशी परिस्थिती झाली.

पर्यायी रस्ता नसल्यामुळे या किरकोळ अपघाताने सुद्धा पूर्वेकडील उपमार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. उलट प्रवास करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिसांसह कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना घाम फुटला होता. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक कोंडी फुटली.

Web Title: Reverse journey through one way at Kolhapur Nakka in karad Satara, traffic stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.