चाऱ्याबाबत खटावचा कृषी विभाग अनभिज्ञ -वडूज येथे आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 08:35 PM2018-11-17T20:35:36+5:302018-11-17T20:37:39+5:30
खटाव पंचायत समितीच्या सभागृहात दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुक्यात सध्या किती चारा उपलब्ध आहे, तो किती दिवस टिकेल,असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र,
वडूज : खटाव पंचायत समितीच्या सभागृहात दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुक्यात सध्या किती चारा उपलब्ध आहे, तो किती दिवस टिकेल,असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र, तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव चौगुले यांना त्याची योग्य माहिती देता आली नाही. यावेळी त्यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे कºहाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी अधिकाºयांना फैलावर घेतले.
आढावा बैठकीस आ. शशिकांत शिंदे, माजी आ. प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निबांळकर, सभापती कल्पना मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते, सुनीता कचरे, कल्पना खाडे, उपसभापती संतोष साळुंखे, माजी सभापती संदीप मांडवे, माजी उपसभापती कैलास घाडगे, पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण, आनंदराव भोंडवे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब इंगळे, राजेंद्र कचरे, सुनील घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चारा उपलब्धतेच्या प्रश्नांवर चौगुले यांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्गाप्रसाद उंडेगावकर यांच्याकडे बोट दाखवले. त्यावर तुमची जबाबदारी असल्याने तुमच्याकडे माहिती असणे गरजेचे आहे, असा मुद्दा आ. बाळासाहेब पाटील यांनी मांडला. त्यावर कृषी अधिकाºयांनी आपल्याकडे डबल चार्ज आहे. त्यामुळे माहिती उपलब्ध नाही असे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पदाधिकाºयांचा अधिक आग्रह झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाची टिप्पणी वाचून दाखवत पदाधिकाºयांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
माजी आ. प्रभाकर घार्गे यांनी ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगातून पाण्याच्या टाक्या घेण्याबाबत जिल्हा परिषदेने परवानगी देण्याची मागणी केली. तर प्रदीप विधाते यांनी बोअरवेल दुरुस्ती यंत्रणा वाढविण्याबरोबर वर्गणीची अट शिथील करण्याची मागणी केली. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी उरमोडी लाभक्षेत्रात प्रामुख्याने चारा लागवड करा, महसूल विभागाने टँकर प्रस्ताव प्रलंबित ठेवू नये. तसेच दुष्काळ परिस्थितीवर पदाधिकारी, अधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी समन्वयातून मार्ग काढावा, असे आवाहन केले.
सभापती कल्पना मोरे यांनी स्वागत केले. चाँद काझी यांनी सूत्रसंचालन केले. उपसभापती संतोष सांळुंखे यांनी आभार मानले.
-खटाव तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळ परिस्थिती अंत्यत गंभीर आहे. तरी खटाव तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीत समावेश् केला नाही. त्यामुळे खटाव दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबत विधानसभेत आवाज उठवणार आहे.
शशिकांत शिंदे, आमदार
-खटाव तालुक्यात उरमोडी धरणातील पाणी परिसरातील पारगाव, येळीव व इतर छोट्या-मोठ्या पाझर तलावात सोडल्यास परिसरातील शेतीला पाणी मिळेल. त्यामुळे त्वरित उरमोडीचे पाणी सोडा.
-बाळासाहेब पाटील, आमदार
उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे तालुक्यातून ज्या गावांनी टँकरचे प्रस्ताव पाठविले असतील, ते प्रस्ताव तातडीने मंजूर करणे, टँकर तपासून घेणे, टँकर सुरू करण्यापूर्वी स्थानिक उपाययोजनांना प्राधान्य द्या.
-संजीवराजे नाईक-निंबाळकर, अध्यक्ष, जिल्हा परिषद