मेगा फूड पार्कमुळे साताऱ्यात घडणार क्रांती
By admin | Published: May 17, 2017 11:16 PM2017-05-17T23:16:29+5:302017-05-17T23:16:29+5:30
मेगा फूड पार्कमुळे साताऱ्यात घडणार क्रांती
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘भारतीय उद्योजक जगतातील एक माईल स्टोन अशी ओळख निर्माण झालेल्या भारत विकास ग्रुपने (बीव्हीजी) विविध क्षेत्रांत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. औद्योगिक विकासाला चालना देऊन रोजगार निर्मिती करणाऱ्या भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून आता साताऱ्यात ऐतिहासिक अशी औद्योगिक क्रांती घडत आहे.
सातारा शहरानजीक देगाव येथे तब्बल ६८ एकर जागेत महत्त्वाकांक्षी असा ‘सातारा मेगा फूड पार्क’ प्रकल्प साकारला जात असून, या फूड पार्कमुळे सातारा शहरासह जिल्ह्यातील उद्योजकतेला पुन्हा एकदा चालना मिळेल,’ असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त असून, रोजगार निर्मितीला नेहमीच प्राधान्य देऊ असे स्पष्ट केले.
साताऱ्याचा औद्यागिक विकास व्हावा, रोजगार निर्मितीबरोबरच साताऱ्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी साताऱ्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतीची विस्तारवाढ करण्याचा प्रयत्न केला होता. साताऱ्यात विविध प्रकारच्या कंपन्या याव्यात, रोजगार निर्मितीत वाढ व्हावी, यासाठी आपणही सातत्याने प्रयत्न केले आहेत. देगाव येथील ६८ एकरात साकारल्या जाणाऱ्या मेगा फूड पार्क प्रकल्पात विविध प्रकारची तब्बल ३० फूड प्रोसेसिंग युनिटस् उभी राहणार आहेत. ६८ एकरात केलेल्या प्लॉटिंगमध्ये बीव्हीजीसह देशभरातील मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी आपले प्रकल्प उभारणार आहेत. यामध्ये मिल्क प्रॉडक्टस, बेकरी प्रॉडक्टस, जॅम, जेली, विविध प्रकराचे मसाले, ज्यूस, मिनरल वॉटर, फूड प्रोसेसिंग युनिटस्, आटा आदी खाद्य पदार्थांशी निगडीत प्रकल्पांचा समावेश असणार आहे.
३० पैकी १५ युनिट खुद्द बीव्हीजीची आहेत. यामध्ये मिल्क प्रॉडक्टस, जाम, फ्रूट ज्युसेस, फ्रूट पल्प, विविध प्रकारचे मसाले, आटा, मिनरल वॉटर आदी प्रकल्प बीव्हीजी उभारत आहे. या १५ पैकी ५ प्रकल्पांचे काम पूर्णत्वास गेले असून, येत्या एक-दोन महिन्यांत हे पाचही प्रकल्प सुरू होणार आहेत. सातारा मेगा फूड पार्क म्हणजे एक रोजगार क्रांतीच ठरणार आहे. या प्रकल्पामुळे किमान ८ ते १० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे साताऱ्यातील हजारो बेरोजगारांना रोजगार मिळेल,’ असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या सहकार्यामुळेच गेल्या दीड वर्षापूर्वी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. आता हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असून, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे पाठबळ कायम असल्यानेच हे साध्य झाल्याचे बीव्हीजीचे अध्यक्ष हणमंत गायकवाड यांनी यावेळी सांगितले. या फूड पार्कमधील बीव्हीजीची पाच युनिटस् सुरू होत असून, यासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट उचलला जाणार आहे.
बेरोजगारांना कामाची संधी..
देगाव येथील ६८ एकरात साकारल्या जाणाऱ्या सातारा मेगा फूड पार्क प्रकल्पात विविध प्रकारची तब्बल ३० फूड प्रोसेसिंग युनिटस् उभी राहणार आहेत. ६८ एकरात केलेल्या प्लॉटिंगमध्ये बीव्हीजीसह देशभरातील मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी आपले प्रकल्प उभारणार आहेत. या प्रकल्पासाठीच्या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. यावेळी बीव्हीजीचे अध्यक्ष हणमंत गायकवाड यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बीव्हीजीला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मदतीमुळेच या तीनही समस्यांवर मात करता आली. साताऱ्याच्या औद्योगिक क्रांतीला चालना मिळावी, बेरोजगारांना रोजगार मिळावा, या हेतूने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वत: सूतगिरणीची रस्त्यासाठी लागणारी जागा या प्रकल्पासाठी देऊ केली.